India Men's vs Women's Cricket Team Salary: भारतीय पुरुष व महिला क्रिकेटपटूंच्या पगारामध्ये ‘इतक्या’ पटीचे अंतर; पहा विराट कोहली, स्मृती मंधाना समवेत संघाला मिळते किती वेतन
बोर्डाच्या वार्षिक करार यादीत एकूण 19 महिला क्रिकेटपटूंचा समावेश असून त्यांचा A, B, आणि C गटात विभागणी करण्यात आली आहे. यापूर्वी बोर्डाने पुरुष खेळाडूंच्या 2021-22 वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती आणि ती पाहता पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा फरक समोर आला आहे.
India Men's vs Women's Cricket Team Salary: बीसीसीआयने (BCCI) महिला खेळाडूंसाठी वार्षिक करार (Women's Cricket Team Central Contract) जाहीर केला आहे. बोर्डाच्या वार्षिक करार यादीत एकूण 19 महिला क्रिकेटपटूंचा समावेश असून त्यांचा A, B, आणि C गटात विभागणी करण्यात आली आहे. यापूर्वी बोर्डाने पुरुष खेळाडूंच्या 2021-22 वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती आणि ती पाहता पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा फरक समोर आला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या पगारामध्ये तब्बल 14 ते 70 पटींचे अंतर आहे. भारताच्या टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती झालेली दिग्गज क्रिकेटर मिताली राजला (MithalI Raj) वार्षिक करारानुसार 30 लाख रुपये पगार मिळतो. याउलट भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) वर्षाला बोर्डाकडून 7 कोटी रुपये मिळतात. (भारतीय महिला क्रिकेट संघासाठी बीसीसीआयकडून खेळाडूंशी करार; हरमनप्रीत कौर, Smriti Mandhana 'अ' तर, मिताली राज, शेफाली वर्मा यांचा 'ब' श्रेणीत समावेश)
महिला क्रिकेटमधील सर्वोच्च अशा A ग्रेडमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळणार आहेत. B ग्रेडमधील खेळाडूंचा वार्षिक पगार 30 लाख तर C ग्रेडमधील खेळाडूंचा वार्षिक पगार 10 लाख आहे. दुसरीकडे, पुरुष संघाच्या A+ ग्रेड विभागात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असून त्यांचा वार्षिक पगार प्रत्येकी 7 कोटी आहे. A ग्रेडमधील खेळाडूंचा 5 कोटी तर B आणि C ग्रेडमधील खेळाडूंचा वार्षिक पगार अनुक्रमे 3 आणि 1 कोटी आहे. अशास्थितीत पुरुष आणि महिला संघाच्या वार्षिक करारांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात असमानता पाहायला मिळत आहे. याचे कारण सांगायचे झाले तर पुरुष क्रिकेटला जास्त पसंती दिली जात आहे, त्यामुळे जाहिराती कंपन्या खूप महागड्या बोलींसह पुरुष संघाचे कंत्राट खरेदी करतात, पुरुष संघाच्या सामन्यांमध्येही मोठी गर्दी असते, ज्यामुळे तिकीट विक्रीतून बरेच उत्पन्न मिळते. याशिवाय पुरुषांच्या सामन्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून ही बीसीसीआयचे बरेच उत्पन्न आहे, तर महिला क्रिकेटमध्ये या प्रकारचे उत्पन्न नसते.
हेच कारण आहे की पुरुष संघाकडून बीसीसीआय जितका जास्त उत्पन्न मिळवतो तितकाच पगार पुरुष खेळाडूंना दिला जातो. दुसरीकडे, निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय खेळाडूंना दरमहा पेन्शन देते, परंतु इथे देखील पुरुष खेळाडूंना महिलांपेक्षा जास्त पेन्शन मिळते.