India Beat Bangladesh: भारताने 'या' पाच खेळाडूंच्या जोरावर पहिल्या कसोटीत बांगलादेशचा केला पराभव, मालिकेत 1-0 अशी आघाडी
पाचव्या दिवसाच्या पहिल्या तासाभरात भारताने सामना जिंकला. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचा कर्णधार होता. कर्णधार म्हणून केएल राहुलचा हा पहिलाच कसोटी विजय होता.
IND vs BAN 1st Test 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला हा विजय मिळाला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या तासाभरात भारताने सामना जिंकला. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचा कर्णधार होता. कर्णधार म्हणून केएल राहुलचा हा पहिलाच कसोटी विजय होता. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी अनेक चांगल्या गोष्टी समोर आल्या. कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजी तसेच फलंदाजीतील काही चांगले शॉट्ससाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला बांगलादेशला विजयासाठी 241 धावांची गरज होती. त्याचवेळी भारत विजयापासून चार विकेट दूर होता. पाचव्या दिवशी बांगलादेशच्या आशास्थानी शकीब अल हसन आणि मेहदी हसन मिराज क्रीझवर उतरले, पण दोघेही संघासाठी विशेष काही करू शकले नाहीत. (हे देखील वाचा: भारत गमावू शकतो World Cup 2023 चे यजमानपद, BCCI समोर आव्हान; घ्या जाणून, नेमके कारण काय?)
विजयात पाच खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान
भारताच्या या विजयात एकूण पाच खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान होते. यामध्ये कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. या पाच जणांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात फारशी खास राहिली नाही आणि सामन्यात भारताने सलग तीन विकेट गमावल्या. तेथून श्रेयस अय्यरने 86 आणि चेतेश्वर पुजाराने 90 धावांसह भारताचा डाव सांभाळला. पहिल्या डावाव्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. पुजाराने 130 चेंडूत 102 धावा केल्या. पुजाराशिवाय शुभमन गिलनेही शतक झळकावले. गिलने 152 चेंडूत 110 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 513 धावांचे लक्ष्य दिले.
कुलदीप आणि अक्षरची उत्कृष्ट गोलंदाजी
गोलंदाजीमध्ये फलंदाजांव्यतिरिक्त कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी उत्कृष्ट खेळ केला. तब्बल 2 वर्षानंतर कुलदीपने कसोटी संघात पुनरागमन करत आपल्या कामगिरीने सर्वांना उत्तर दिले. कुलदीपने दोन्ही डावात एकूण 8 विकेट घेतल्या आणि बॅटने 40 धावा केल्या. कुलदीपशिवाय अक्षर पटेलनेही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. अक्षरला पहिल्या डावात विकेट मिळाली नसली तरी दुसऱ्या डावात चार महत्त्वाच्या विकेट घेत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील पुढील सामना 22 डिसेंबरपासून ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करायचा आहे. या सामन्यात संघाचा कर्णधार रोहित शर्माही पुनरागमन करत आहे.