IND W vs AUS W Day/Night Test: ऐतिहासिक गुलाबी कसोटीत स्मृती मंधानाने घडवला इतिहास, असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर
IND W vs AUS W Day/Night Test: भारतीय महिला (India Women) आणि ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) क्रिकेट संघ यांच्यात पहिला दिवस/रात्र कसोटी (D/N Test) सामना सुरू झाला आहे. गुलाबी चेंडूने (Pink Ball) खेळलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ टॉस गमावून पहिले फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. गुलाबी बॉल कसोटी सामन्यात स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) भारतासाठी इतिहास रचला आहे. गुलाबी बॉल कसोटी (Pink Ball Test) सामन्यात अर्धशतक करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाने यापूर्वी अॅशेस 2017 मध्ये पहिल्यांदा पिंक-बॉल टेस्ट सामना खेळला होता. तर भारतीय महिला संघ (India Women's Team) आपला पहिला गुलाबी चेंडू कसोटी सामना खेळत आहे. मंधानाने तिचे अर्धशतक 51 चेंडूत पूर्ण केले. या डावात स्मृतीने 11 चौकार लगावले. मंधानाच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक आहे. (IND-W vs AUS-W D/N Test Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया महिला पिंक-बॉल टेस्ट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट व ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहणार?)
यापूर्वी पहिले फलंदाजीला उतरून भारतासाठी मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. शेफालीने 64 चेंडूत 31 धावा केल्या. या दरम्यान तिने चार चौकार मारले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन महिला संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, डार्सी ब्राऊन आणि स्टेला कॅम्पबेल यांनी ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले तर यस्तिका भाटिया आणि मेघना सिंह यांनी भारतासाठी पदार्पण केले. हरमनप्रीत कौर सध्या दुखापतीमुळे वनडे मालिकेनंतर या ऐतिहासिक सामन्यातून देखील बाहेर पडली आहे. तथापि, हा नाणेफेक गमावणे कांगारू संघासाठी आतापर्यंत अयोग्य सिद्ध झाले आहे. पावसाने दिवसाचा खेळ खराब केला तेव्हा भारताने 44.1 ओव्हर खेळून एक विकेट गमावून 132 धावा केल्या आहेत. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा स्मृती 70 धावांवर नाबाद होती. दुसऱ्या टोकाला पूनम राऊत 8 धावा करून खेळत होती.
स्मृती मंधानाचा खेळ अतिशय आकर्षक दिसत आहे. तिने ऑफ साईडवर अनेक शानदार चौकार मारले. मंधानाने अद्याप कसोटी शतक केले नाही, पण आता तिला या कसोटीत पहिले टेस्ट शतक झळकावण्याची मोठी संधी आहे. दुसरीकडे, सामान्यतः आक्रमक असलेल्या शेफाली वर्माने मंधनाच्या सहाय्यकाची भूमिका बजावली. मंधानाने अतिशय वेगाने अर्धशतक झळकावले पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी तिच्या धावगतीला वेसण घातली.