IND vs WI Series 2022: शिखर धवन, रुतुराज गायकवाड कोविड-19 पॉझिटिव्ह, आता 14 महिन्यांपूर्वी वनडे खेळलेला बनणार रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर?
यासाठी मयंक अग्रवाल आणि व्यंकटेश अय्यरचे नाव सध्या समोर येत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) वनडे मालिकेपूर्वी कोरोना प्रकरण समोर आल्याने टीम इंडियामध्ये (Team India) खळबळ उडाली आहे. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी रात्री उशिरा मीडिया अॅडव्हायझरी जारी करून सांगितले की विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालेले टीम इंडियाचे चार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan), नवदीप सैनी (स्टँडबाय खेळाडू), रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि श्रेयस अय्यर या चार खेळाडूंची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहेत. भारतीय संघाच्या चार खेळाडूंसह एकूण सात सदस्य कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळले असून उर्वरित तीन सपोर्ट स्टाफमधील आहेत. या सर्वांना आता सात दिवस क्वारंटाईन राहायचे असल्यामुळे अशा परिस्थितीत 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून हे चारही खेळाडू बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता निवड समितीने मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) वनडे संघात समावेश केला आहे. (IND vs WI: भारतीय क्रिकेट संघात कोरोना उद्रेक, वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेपूर्वी आठ खेळाडू COVID-19 संक्रमित- रिपोर्ट)
भारताच्या नियमित संघात कर्णधार रोहित शर्मासह शिखर धवन आणि रुतुराज गायकवाड यांचा सलामी फलंदाज म्हणून समावेश केला गेला होता. तसेच नियमित उपकर्णधार केएल राहुल देखील सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आता दोन सलामीवीर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आणि राहुल उपलब्ध नसल्याने रोहितला सलामीसाठी आता एक नवीन जोडीदार मिळू शकतो. यासाठी मयंक अग्रवाल आणि व्यंकटेश अय्यरचे नाव सध्या समोर येत आहे. मयंकने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले. तर 2020 मध्ये तो सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा त्याने शेवटचा सामना खेळला होता. मयंकने जवळपास दीड वर्षांपासून एकही वनडे सामना खेळलेला नाही. असे असूनही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान मयंकला अजून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही आहे. कारण मयंकच्या जागी व्यंकटेश अय्यरला देखील सलामीला संधी दिली जाऊ शकते. अय्यरने गेल्या वर्षी आयपीएलच्या युएई टप्प्यात सलामीवीर म्हणून पदार्पण केले होते. तथापि त्याला भारतीय संघात मधल्या फळीत फलंदाजीला उतरवले जिथे तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे धवन आणि रुतुराजच्या अनुपस्थितीत आता त्याला सलामीला उतरवण्याचा निर्णय कर्णधार रोहित आणि संघ व्यवस्थापन घेऊ शकतात.