IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध Rishabh Pant याला ओपनिंगला पाठवण्यामागे काय होता टीम इंडियाचा गेम प्लॅन, कर्णधार रोहित शर्माने सांगितला

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने पंतसोबत सलामीला उतरला तर केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. सामना संपल्यानंतर रोहितने निर्णयाचे स्पष्टीकरण दिले.

रोहित शर्मा, रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसऱ्या वनडे सामन्यात रिषभ पंतला (Rishabh Pant) सलामीला पाठवण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयोग फसला असला तरीही हा  धाडसी प्रयोग वाखाणण्याजोगा होता. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) असूनही युवा यष्टिरक्षक-फलंदाजाला क्रमवारीत बढती देण्यामागचा नेमका काय विचार होता? दुसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) या प्रकरणावर प्रकाश टाकला. शिखर धवन आणि रोहित शर्मा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिली पसंतीची सलामीची जोडी आहे. राहुल सलामीवीर असला तरी किमान पुढील दोन वर्षे तो मधल्या फळीमध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. बुधवारी राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि सूर्यकुमार यादवसोबत भागीदारी करून सामना वाचवला. (IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने केला कहर, रोहित ब्रिगेडकडून वेस्ट इंडिजचा 44 धावांनी दारुण पराभव; 2-0 अजेय आघाडीसह मालिका केली काबीज)

राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने भारतीय संघ संतुलित दिसला. तथापि याचा अर्थ धवन आणि रोहितपैकी एक अनुपलब्ध असल्यास पंत भारतीय संघात राखीव सलामीवीर होईल का? सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात रोहितने पंतसोबत सलामीचा निर्णय हा केवळ एक प्रयोग असल्याचे म्हटले कारण भारतीय संघ काही नवीन गोष्टी करून पाहण्याच्या टप्प्यात आहे. “मला वेगवेगळ्या गोष्टी करण्यास सांगितले गेले आहे, पंतला सलामीला आणण्याचा प्रयत्न करणे ही एक गोष्ट होती जी आम्ही आज करून पाहिली, कायमस्वरूपी उपाय नाही पण आज काहीतरी अनोखे करून पाहायचे आहे. आम्ही पुढच्या सामन्यात शिखर धवन परत आणणार आहोत, त्याला खेळासाठी वेळ मिळेल पण शेवटी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वापरून पहाव्या लागतील. इकडे तिकडे खेळ हरायला आमची हरकत नाही पण आम्हाला प्रयोग करत राहायचे आहे,” तो म्हणाला.

दुसरीकडे, भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी विजय नोंदवत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या चार विकेट्सच्या जोरावर भारताने 237 धावांचे रक्षण केले आणि वेस्ट इंडिजचा 44 धावांनी पराभव केला. आता भारतीय संघ 11 फेब्रुवारी रोजी क्लीन स्वीपच्या उद्देशाने मैदानात उतरेल.