IPL Auction 2025 Live

IND vs WI 1st ODI: पहिल्या अहमदाबाद वनडेत टीम इंडियाच्या नावे होणार आतापर्यंत कोणताही संघ करू शकलेला विश्वविक्रम, रोहित शर्मासाठी सामना ठरणार खूप खास

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनही सामने खेळले जातील. पहिला एकदिवसीय सामना सर्व टीम इंडियासाठी एका कारणामुळे विशिष्ट ठरणार आहे. पहिला एकदिवसीय सामना खेळायला मैदानात उतरताच भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय जोडेल.

केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st ODI 2022: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीनही सामने खेळले जातील. गेल्या वर्षी पूर्णवेळ भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनल्यानांतर रोहित शर्माची (Rohit Sharma) ही पहिली मालिका असणार आहे. इतकंच नाही तर पहिला एकदिवसीय सामना कर्णधार रोहितसह सर्व टीम इंडियासाठी (Team India) एका कारणामुळे विशिष्ट ठरणार आहे. पहिला एकदिवसीय सामना खेळायला मैदानात उतरताच भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय जोडेल. 6 फेब्रुवारीला भारतीय क्रिकेट संघ वनडे क्रिकेटच्या इतिहासातील 1000 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 1000 एकदिवसीय सामने खेळणारा भारत हा पहिला संघ बनेल. (IND vs WI ODI 2022: 10 वर्षानंतर अहमदाबादमध्ये भारत-वेस्ट इंडिज येणार आमनेसामने, जाणून घ्या कोण आहे कोणाच्या वरचढ)

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 957 वनडे सामने खेळले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 936 वनडे सामने खेळले आहेत. 870 सामने खेळून श्रीलंका चौथ्या क्रमांकावर असून पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत 834 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाने आतापर्यंत 999 खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये 518 सामने जिंकले आहेत आणि 431 सामने गमावले आहेत. याशिवाय 9 सामने बरोबरीत राहिले तर 41 सामन्यांचा निकाल लागला नाही. माजी फलंदाज अजित वाडेकर हे भारताच्या वनडे संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी 1971 मध्ये प्रथम संघाची धुरा आपल्या हाती घेतली. 1974 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे वाडेकर कर्णधार असून त्या दौऱ्यात त्यांनी पहिल्याच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.

13 जुलै, 1974 रोजी भारताने इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला, हा ऐतिहासिक एकदिवसीय सामना प्रत्येकी 55 षटकांचा होता ज्यात इंग्लंडने 4 गडी राखून सामना जिंकण्यात यश मिळवले. याशिवाय सर्वप्रथम भारतीय संघाने 1983 मध्ये विश्वचषक जिंकला होता, तर 28 वर्षांनंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा विश्वविजेता बनली.