IND vs SL Series 2022: टीम इंडियाला T20 मालिकेपूर्वी दुहेरी दणका, दीपक चाहर याच्यानंतर ‘हा’ धुरंधर फलंदाज पण श्रीलंका मालिकेतून OUT
वेगवान गोलंदाज दीपक चाहर याच्यानंतर तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. सूर्यकुमारने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजवर भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
IND vs SL Series 2022: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला (Team India) दुखापतीचा आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला असून, वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याच्यानंतर तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. सूर्यकुमारने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजवर भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. क्रिकबझच्या वृतानुसार, फलंदाज लखनऊ (Lucknow) येथे पहिल्या टी-20 सामन्यासाठी पोहोचले आहे, परंतु तो सामना खेळणार नाही. त्याच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. (IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची ताकद वाढली; तीन महिन्यानंतर ‘या’ ‘मॅच-विनर’ खेळाडूचे झाले आगमन, अष्टपैलू वेंकटेश अय्यर याची होणार सुट्टी?)
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सूर्यकुमारने 18 चेंडूत 34 नाबाद धावा ठोकल्या आणि यजमान संघाला 158 धावांचा यशस्वी पाठलाग करून दिला. दुसऱ्या टी-20 सामन्यात तो अवघ्या 8 धावांवर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात 31 वर्षीय फलंदाजाने 31 चेंडूत 65 धावा करून भारताला 184/5 अशी मोठी धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. अशा परिस्थितीत सूर्यकुमारची अनुपस्थिती हा टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरू शकते कारण यजमान संघातून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्ध आगामी व्हाईट-बॉलच्या तीनही सामन्यांसाठी दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच उपकर्णधार केएल राहुल देखील अद्याप दुखापतीतून सावरत असल्यामुळे बाहेर बसला आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिल्या सामन्यापासूनच स्वयंचलित निवड असेल. तर दीपक हुडा यालाही पदार्पणाची संधी दिली जाईल.
दरम्यान बीसीसीआयने अद्याप सूर्यकुमारच्या दुखापतीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील तीन टी-20 सामने अनुक्रमे 24, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी खेळले जातील. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर पहिला सामना तर पुढचे दोनही सामने धर्मशाला येथे खेळले जातील. तीन टी-20 सामन्यांनंतर, दोन्ही संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने येतील. मोहाली आणि बेंगळुरू येथे अनुक्रमे 4 आणि 12 मार्च रोजी सामने सुरू होतील.