IND vs SL Series 2021: टीम इंडियाचे हे 3 धडाकेबाज फलंदाज करू शकतात श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई 

अनुभवी धवनला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर अशा तडाखेबाज फलंदाजांचा समावेश झाला आहे जे लंकन गोलंदाजांची धुलाई करून वर्चस्व गाजवू शकतात.

हार्दिक पांड्या आणि शिखर धवन (Photo Credit: Twitter/BCCI)

बीसीसीआयने भारतीय संघाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वात 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी धवनला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहेत. कृणाल पांड्या, नवदीप सैनी, दीपक चाहर यांचे संघात पुनरागमन झाले आहेत तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, चेतन सकारिया समवेत युवा आणि नवख्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारतीय संघात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित करण्याची युवा खेळाडूंना चांगली संधी आहे. श्रीलंका दौऱ्यावर अशा तडाखेबाज फलंदाजांचा समावेश झाला आहे जे लंकन गोलंदाजांची धुलाई करून वर्चस्व गाजवू शकतात. (IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोन खेळाडूंकडे निवड समितीने फिरवली पाठ, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल!)

शिखर धवन (Shikhar Dhawan)

मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध अखेरचं आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला टीम इंडियाचा ‘गब्बर’ यंदा फलंदाजीसोबत नेतृत्वाने देखील निवड समितीचा निर्णय योग्य ठरवण्यासाठी उत्सुक असेल. इंग्लंड विरोधात धवन वनडे मालिकेत चमकला असला तरी त्याला टी-20 मालिकेत अपेक्षित संधी मिळाली नाही. धवन एकच टी-20 सामना खेळला आणि त्यामध्ये तो फक्त 4 रन करून माघारी परतला. मात्र, धवनला आयपीएलमध्ये सूर गाजवसला आणि त्याने प्रत्येक गोलंदाजावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर धवनची बॅट धावा काढण्यासाठी उत्सुक असेल.

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)

अखेर 2020 न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय वनडे सामना खेळलेल्या पृथ्वीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या कसोटी सामन्यानंतर संघातून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले. मात्र, त्याने आपला खराब फॉर्म मागे टाकत घरगुती आणि आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी बजावली व धावा लुटल्या. आयपीएलमध्ये पृथ्वीने आपली जुनी लय पुन्हा मिळवली आणि निवड समितीला प्रभावित करत श्रीलंका दौऱ्याच तिकीट मिळवलं. अशास्थितीत लंकेत देखील पृथ्वीने जर आपली लय कायम ठेवली तर तो तिथे देखील गोलंदाजांवर भारी पडेल आणि धावांचा डोंगर उभारेल.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याचा समावेश न होणे शक्यच नाही. हार्दिक आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसला तरी वेळ येताच तो अनेकदा संघाच्या कामी आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील हार्दिकने मर्यादित ओव्हर मालिकेत मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत प्रभावी कामगिरी बजावली आणि संघातील आपले स्थान कायम ठेवले. श्रीलंका दौऱ्यावर हार्दिक लयीत परतला तर तो नक्कीच धावांचा डोंगर उभारू शकतो.