IND vs SL Pink-Ball Test Day 2: बेंगलोर कसोटीत दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाचा बोलबाला, श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 रन्स तर भारत 9 विकेट्स दूर
दुसऱ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे दिले. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकन संघाने 28/1 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत पाहुण्या संघाला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज आहे.
IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात बंगळुरू येथे पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि आता श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे दिले. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकन संघाने लाहिरू थिरीमाने याची एकमात्र विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आता पाहुण्या संघाला हाती नऊ विकेट शिल्लक असताना विजयासाठी आणखी 419 धावांची गरज आहे. पाहुण्या श्रीलंकेसाठी सध्या कुसल मेंडिस 16 धावा आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने 10 धावा करून खेळत आहेत. दुसरीकडे, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने टीम इंडियाला दुसऱ्या डावात एकमात्र विजय मिळवून दिला आहे. (IND vs SL: विराट कोहली याच्या चर्चेत ‘या’ खेळाडूकडे झाले दुर्लक्ष, गेल्या 12 डावांतील आकडे आहेत चिंताजनक)
दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्याबद्दल बद्दल बोलायचे तर टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या तर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 109 धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे 143 धावांची आघाडी घेतली. भारतासाठी पहिल्या डावात धुरंधर फलंदाज अपयशी ठरत असताना श्रेयस अय्यर याने एक हाती मोर्चा सांभाळला आणि 92 धावांची झुंजार खेळी करून भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे लंकन संघाने गुडघे टेकले आणि पहिल्या डावात 109 धावांवर ऑलआऊट झाले. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने 67 धावांची मोठी खेळी केली. तर ऋषभ पंतने 50, कर्णधार रोहित शर्माने 46 आणि मयंक अग्रवाल व रवींद्र जडेजाने प्रत्येकी 22 धावांचे छोटेखानी योगदान दिले.
यापूर्वी मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा तीन दिवसांत एक डाव आणि 222 धावांनी धुव्वा उडवला व दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता बेंगलोर कसोटीवरील आपली पकड घट्ट करून भारत मायदेशात दिवस/रात्र कसोटी सामन्यातील आपली अपराजित मालिका कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे. पण भारतीय फिरकीऐवजी वेगवान गोलंदाज यशस्वी ठरत आहेत. अशा परिस्थतीत आता तिसऱ्या दिवशी बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याकडून पुन्हा एकदा प्रभावी खेळीची अपेक्षा असेल.