IND vs SL 2nd T20I: युजवेंद्र चहल इतिहास घडवण्यापासून 1 विकेट दूर, श्रीलंकेविरुद्ध दुसर्या टी-20 सामन्यात नोंदवणार एक विशेष रेकॉर्ड
चहलने या सामन्यात एखादी विकेट काढली तर तो टी-20 मध्ये लंकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. चहलकडे सध्या श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये सात डावांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. कोलंबोमध्ये मंगळवारी पाहुणा संघ मालिका खिशात घालण्यासाठी मैदानात उतरेल.
IND vs SL 2nd T20I: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारतासाठी (India) आतापर्यंतच्या सर्वांत सकारात्मक कामगिरी केली आहे. लेगस्पिनर श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळाच्या सर्वात छोट्या स्वरूपामध्ये अनोखा पराक्रम गाठण्याच्या मार्गावर आहे. कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियाचा 3 सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्या सामन्यात यजमान संघाशी सामना होईल. चहल बहुधा भारताच्या फिरकी हल्ल्याचे नेतृत्व करेल आणि जर त्याने एखादी विकेट काढली तर तो टी-20 मध्ये लंकेविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. चहलकडे सध्या श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये सात डावांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. चहल आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डन (Chris Jordan) यांनी संयुक्तपणे श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक टी-20 गडी बाद केले आहेत. (IND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा)
ड्वेन ब्रावो, दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इमरान ताहिर, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झांपा यांनी प्रत्येकी श्रीलंकन संघाविरुद्ध 14 विकेट्सची नोंद केली आहे. इतकंच नाही तर श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना चहलच्या कारकिर्दीतील 50 वा सामना असणार आहे. आतापर्यंत त्याने 25.30 च्या सरासरीने एकूण 63 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आधी केवळ 8 खेळाडूंनी टी-20 क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठला आहे. भारतीय संघासाठी रोहित शर्माने आतापर्यंत सर्वाधिक 111 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
शिवाय, सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्यावर चहल खूपच प्रभावी ठरला आहे. त्याने दोन सामन्यांत 20.40 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या असून तो एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. यापूर्वी रविवारी त्याने धनंजया डी सिल्वाची विकेट घेतली आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसरीकडे, कोलंबोमध्ये मंगळवारी पाहुणा संघ मालिका खिशात घालण्यासाठी मैदानात उतरणार असताना चहल सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोलंबो येथे होणाऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्याची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आल्यामुळे मंगळवार, 27 जुलै रोजी होणारा सामना चोवीस तास, 28 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.