IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूंवर असणार नजर, जबर कामगिरी केल्यास मिळू शकते टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट

भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या नेतृत्वात आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी संघातील युवा ब्रिगेड सज्ज होत आहे. दौऱ्यावरील संघातील काही खेळाडू टी-20 संघात स्थान मिळवण्याचे प्रबळ दावेदार आहेत तर आपली निवड निश्चित करण्यासाठी निवड समितीला प्रभावित करून टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट निश्चित करू शकतात.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2021: भारताचा (India) अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या नेतृत्वात आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) संघातील युवा ब्रिगेडने मुंबईमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत जिममध्ये मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी  भारतीय संघाच्या आगामी श्रीलंका दौरा काही व्हाईट बॉल विशेषज्ञांना त्यांची योग्यता सिद्ध करण्यासाठी आणि आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियामध्ये (Team India) जागा बुक करण्याची संधी देईल. आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेतील असे तब्बल 6 खेळाडू आहेत जे भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू शकतात. दौऱ्यावरील संघातील काही खेळाडू टी-20 संघात स्थान मिळवण्याचे प्रबळ दावेदार आहेत तर काही टी-20 विश्वचषक संघात आपली निवड निश्चित करण्यासाठी निवड समितीला प्रभावित करू शकतात. (IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर Rahul Dravid करणार टीम इंडियाचे मार्गदर्शन, BCCI सचिव जय शाह यांची माहिती)

कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत 3 वनडे आणि तितकेच टी-20 सामने खेळणार आहेत. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे श्रीलंका दौऱ्यावर प्रभावी कामगिरी करून भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट निश्चित करू शकतात.

1. शिखर धवन (Shikhar Dhawan)

टी-20 विश्वचषकमध्ये ज्येष्ठ खेळाडू शिखर धवनला पाहणे आश्चर्यकारक ठरणार नाही. श्रीलंका दौर्‍यावर त्याला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीदेखील टी-20 मध्ये सलामीवीर म्हणून पर्याय असल्यामुळे भारतीय संघात धवनला स्थान मिळवण्यासाठी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. तथापि, कोलंबोमध्ये आयपीएल 2021 मधील प्रभावी कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो यशस्वी ठरला तर टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याचे स्थान निश्चित असेल.

2. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

ऑस्ट्रेलियाविरूद्ध फक्त एक टी-20 सामन्यात शानदार प्रदर्शन केल्यानंतर चहल गोलंदाजीत अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध आणि नंतर आयपीएल 2021 मधेही चहलचा खराब फॉर्म सुरूच राहिला जिथे तो थोडासा महागडा आणि विकेट घेण्यास धडपडताना दिसला. त्यामुळे, श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्याची कामगिरी पुढे जाण्याचा दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे.

3. कुलदीप यादव (Kuldeep Yadav)

चहलचा फिरकी जोडीदार यादव गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरला आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यादव चेंडूने छाप पाडण्यास अपयशी ठरला. खराब इकॉनॉमी रेट आणि विकेटविरहित कामगिरीमुळे त्याला आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) खेळण्याची संधी मिळाली नाही. अशास्थितीत यादवसाठी श्रीलंकेत करो किंवा मरोची स्थिती असेल.

4. मनीष पांडे (Manish Pandey)

मनीष पांडेने श्रीलंकेत कामगिरी बजावल्यास आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला संधी मिळू शकते. आयपीएल 2021 मध्ये त्याने पाच सामन्यात केलेल्या 193 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याची 44.31 सरासरी त्याला टीम इंडियात स्थान मिळवून देऊ शकते. जरी तो बर्‍याच दिवसांपूर्वी भारतीय संघाकडून खेळला असला तरी टीम इंडियासाठी नियमित संधी मिळाल्यास तो एक उपयुक्त खेळाडू ठरू शकतो.

5. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

इंग्लंड विरुद्ध टी-20 सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या यादवसाठी श्रीलंकेतही सर्वकाही योग्यरितीने गेल्यास तो आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान निश्चित करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह (एमआय) सातत्यपूर्ण कामगिरी देखील त्याला पाठिंबा देण्याचे आणखी एक कारण बनू शकते.

दरम्यान, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल, रुतूराज गायकवाड, नितीश राणा आणि ईशान किशन हे युवा क्रिकेटपटू देखील प्रभावी कामगिरी करत टी-20 विश्वचषकसाठी भारतीय संघाचे दार ठोठावू शकतात.