Virat Kohli म्हणाला - ‘ताली मारते रहो’; केपटाउन कसोटीत उत्साही कोहलीच्या आदेशावर भारतीय डगआऊटमधील खेळाडूंनी केला टाळ्यांचा गजर (Watch Video)

त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने भारतीय खेळाडूंना त्याच्या वेगवान गोलंदाजांना चीअर करण्यासाठी बेंचवर बसवले. डगआऊटमधील खेळाडू देखील एका विशिष्ट लयीत टाळ्या वाजवत राहिले.

कोहलीने गोलंदाजांना चीअर करवले (Photo Credit: Twitter)

IND vs SA 3rd Test 2022: विराट कोहली (Virat Kohli) स्वत: एक फलंदाज असला तरी वेगवान गोलंदाजीबद्दल त्याच्या प्रेमाला कोणतीही कमी नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने बेंचवरील भारतीय खेळाडूंना वेगवान गोलंदाजांसाठी टाळ्या वाजवत राहण्याची सूचना केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला असून तो व्हायरल झाला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बंदी घातल्याने कोहलीला चाहत्यांच्या मोठ्या जल्लोषाची नक्कीच उणीव भासत होती. तथापि, दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान त्याने एक योजना आखली. स्टेडियममध्ये चाहते उपस्थित नसताना 33 वर्षीय खेळाडूने डगआऊटमधील भारतीय खेळाडूंना वेगवान गोलंदाजांना चिअर करण्याच्या सूचना दिल्या. ज्याचे पालन करून खेळाडूंनी देखील उत्साहात टाळ्यांचा गजर केला. (IND vs SA 3rd Test Day 2: कसोटी क्रिकेटमध्ये Virat Kohli ने पूर्ण केले ‘हे’ खास शतक, अशी कमाल करणारा ठरला सहावा भारतीय)

केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे 2 फलंदाज - टेंबा बावुमा आणि कीगन पीटरसन विकेटवर तळ ठोकून खेळत होते. दोघांनीही 42 धावा जोडल्या होत्या पण ही जोडी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तोडली. चेंडू नक्कीच शमीचा होता पण त्यात कर्णधार कोहलीचे योगदान मोठे होते. कोहलीने चहापानाच्या आधीच्या सत्रात सर्व क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना उत्साहाने भरले. इतकेच नाही तर भारतीय कर्णधाराने डगआऊटमध्ये बसलेल्या भारतीय खेळाडूंनाही टाळ्या वाजवण्यास सांगितले. विराट कोहलीने खेळाडूंना सांगितले - “टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.” आणि मग काय खेळाडूंनी देखील आपल्या कॅप्टनचे आदेश मानले आणि मैदानावर उतरलेल्या खेळाडू विशेषतः गोलंदाजांचे कौतुक व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्यांचा गजर सुरु केला.

कोहलीने आपल्या खेळाडूंमध्ये आग भरताच गोलंदाजांचा उत्साह वाढला. 56 व्या षटकात शमीने टेंबा बावुमाला उत्कृष्ट आऊट स्विंगवर बाद केले. या झेलसह त्याने कसोटी क्रिकेटमधील 100 वा झेलही पूर्ण केला. यानंतर शमी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने एका चेंडूनंतर आणखी एक विकेट घेतली. शमीने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक काइल वेरेनला पंतच्या हाती बाद करून देत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. यानंतर, चहापानाच्या विश्रांतीपूर्वी जसप्रीत बुमराहने मार्को जॅन्सनला इनस्विंगवर माघारी पाठवून दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले.