IND vs SA 3rd T20I: विराट कोहली पुन्हा एकदा धावांच्या शिखरावर; 'गब्बर' शिखर धवन चा रोहित शर्मा, विराटच्या 'या' यादीत समावेश

विराटने पुन्हा एकदा आपला सहकारी रोहित शर्मा याला मागे सारत टी-20 मध्ये धावांच्या शिखरावर पोहचला आहे. शिवाय, टीम इंडियाचा दुसरा सलामीवीर शिखर धवनने टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या.

(Photo Credit: Getty)

रविवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुध्द बंगळुरू येथे सुरु असलेल्या तिसर्‍या टी-20 मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा विक्रमाची नोंद केली आहे. विराटने पुन्हा एकदा आपला सहकारी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे सारत टी-20 मध्ये धावांच्या शिखरावर पोहचला आहे. या मॅचदरम्यान रोहितने प्रथम विराटला मागे सोडले आणि काही मिनिटांनंतर विराटने पुन्हा त्याला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराट प्रथम तर रोहित दुसर्‍या क्रमांकावर होता. विराट 71 सामन्यांत 50.85 च्या सरासरीने 2441 धावांनी अव्वल क्रमांकावर होता तर रोहित 97 मॅचमध्ये 32.45 च्या सरासरीने 2434 धावांसह दुसर्‍या स्थानावर होता. (IND vs SA 3rd T20I: रोहित शर्मा ने केली एमएस धोनी च्या रेकॉर्डची बरोबरी, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध केली 'ही' कामगिरी)

विराटला मागे ठेवण्यासाठी रोहितला 8 धावा करण्याची गरज होती आणि त्याने डावाच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये कागिसो रबाडा याच्या चेंडूंवर सलग दोन चौकारांसह विराटला पुन्हा मागे टाकले. अशा प्रकारे त्याने 98 सामन्यांत 32.14 च्या सरासरीने 2443 धावा केल्या. पण, बाद होताच विराटने पुन्हा एकदा रोहितला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. 9 धावा करत मिडविकेटच्या हद्दीत विराट रबाडाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने आता, 72 सामन्यात 51.04 च्या सरासरीने 2450 धावा केल्या आहेत.

याशिवाय, टीम इंडियाचा दुसरा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) यानेदेखील या मॅचमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्या डावात आफ्रिकाविरुद्ध चार धावा करत धवनने टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. धवनपूर्वी विराट कोहली, सुरेश रैना (Suresh Raina) आणि रोहित यांनीदेखील टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी हे स्थान मिळवले आहे. 7000 धावांपर्यंत पोहोचणारा धवन चौथा भारतीय फलंदाज ठरला. टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा वेस्ट इंडिजचा क्रिस गेल आहे. गेलने 391 सामन्यात 13021 धावा केल्या आहेत. तर, दुसर्‍या स्थानावर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रॅंडन मॅक्युलम आहे ज्याने 370 सामन्यात 9922 धावा केल्या आहेत. किरोन पोलार्ड तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 484 सामन्यांमध्ये 9601 धावा त्याच्या नावावर आहेत.