IND vs SA 2nd Test Day 3: दुसऱ्या कसोटीत दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या 118/2 धावा, विजयापासून आणखी 122 रन तर टीम इंडिया 8 विकेट दूर

तिसऱ्या दिवसाखेरीस यजमान दक्षिण आफ्रिका विजयापासून 122 धावा दूर आहे तर भारताला आणखी 8 विकेटची गरज आहे. भारतीय संघाने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात डीन एल्गरच्या नेतृत्वात यजमान संघाने दिवसाखेर दोन बाद 118 धावा केल्या आहेत.

डीन एल्गार (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीत (Johannesburg Test) हळूहळू विजय भारतापासून (India) दूर जात चालला आहे. तिसऱ्या दिवसाखेरीस यजमान दक्षिण आफ्रिका  (South Africa) विजयापासून 122 धावा दूर आहे तर भारताला आणखी 8 विकेटची गरज आहे. भारतीय संघाने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात डीन एल्गरच्या (Dean Elgar) नेतृत्वात यजमान संघाने दिवसाखेर दोन बाद 118 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार डीन एल्गर 46 धावा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन 11 धावा करून नाबाद खेळत होते. यापूर्वी दिवसाच्या दुसऱ्या सत्रात  यजमान गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजीने भारताचा दुसरा डाव 266 धावांत गुंडाळला होता. भारतासाठी अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 58 तर चेतेश्वर पुजाराने 53 धावा केल्या. तसेच हनुमा विहारी 40 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले. (IND vs SA 2nd Test: तिसऱ्या दिवशी दमदार अर्धशतकांसह चेतेश्वर पुजारा - अजिंक्य रहाणेने मिटवला ‘PURANE’ वाद, एका खेळीने टीकाकारांची केली बोलती बंद)

दिवसाच्या सुरुवातीला रहाणे-पुजाराने 85/2 धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधीपासून सातत्याने टीकेचा सामना करणारे पुजारा-रहाणेने दमदार फलंदाजी करून शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. यादरम्यान दोघांनी आपापली अर्धशतके झळकावली आणि संघाची आघाडी शंभरी पार नेली. तथापि दोघे चांगल्या सुरुवातीचा मोठ्या खेळीत रूपांतर करू शकले नाही. रहाणे रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने काइल वेरेनकडे झेलबाद झाला तर रहाणे पाठोपाठ पुजारा देखील पायचीत होऊन बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यावर भारताचा डाव गडगडला. रिषभ पंत भोपळाही न फोडता तंबूत परतला. एनगिडीने अश्विनला 16 धावांवर बाद केले. अश्विन आणि शार्दूल ठाकूरकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या पण ते देखील बॅटने कमाल करू शकले नाही. शमी, बुमराह आणि सिराज देखील स्वस्तात बाद झाले. सिराज बाद होताच भारताचा दुसरा डाव 266 धावांवर संपुष्टात आला.

भारताच्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली एडन मार्करम आणि एल्गरने पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. पण मार्करमला पायचीत करून शार्दूल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. एल्गर आणि कीगन पीटरसनची जमलेली जोडी आर अश्विनने फोडली. त्याने 28 धावांवर पीटरसनला पायचीत केलं. पण एल्गर आणि वॅन डर डुसेनने दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला सामन्यावर पकड मिळवून दिली आहे.