IND vs PAK: दबावाखाली खेळायला शिकायचे आहे तर भारताविरुद्ध खेळा, पाकिस्तानी गोलंदाजाने आठवणींना उजाळा देत दिली मोठी प्रतिक्रिया
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 2012-13 द्विपक्षीय मालिकेत भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव सांगितला. खान पुढे म्हणाला की, भारत-पाकिस्तान सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक दाबाचे सामने असतात.
IND vs PAK: वेगवान गोलंदाज जुनैद खानने (Junaid Khan) म्हटले आहे की जर कोणत्याही पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेटपटूला सामन्यात दबावाखाली कसे खेळायचे शिकायचे असल्यास त्यांनी टीम इंडियाविरुद्ध (Team India) खेळावे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 2012-13 द्विपक्षीय मालिकेत भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव सांगितला. खान पुढे म्हणाला की, भारत-पाकिस्तान सामने (IND vs PAK Series) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक दाबाचे सामने असतात. या दोन संघांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका पाकिस्तानमध्ये 2-1 ने जिंकली होती. टी -20 आय मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती तर 2007 मध्ये पाकिस्तानने भारत दौर्यावर असताना दोन्ही देशांमधील अखेरची कसोटी मालिका रंगली होती. 2012-13 दौर्यामध्ये खेळणारा खान एकदिवसीय मालिकेतील संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने एकूण 8 विकेट्स घेतल्या ज्यामध्ये नवी दिल्लीतील (New Delhi) वनडे सामन्यातील 4 विकेट्सचा देखील समावेश होता. (IND vs PAK T20I Series: भारत आणि पाकिस्तान संघ 2021 च्या उत्तरार्धात खेळणार टी-20 मालिका, पाकिस्तानी मीडियाचा दावा)
क्रिकेट पाकिस्तानशी नुकत्याच झालेल्या संवादात जुनैदने सांगितले की भारतातील त्या मालिकेने त्याला कठीण परिस्थितीत दबावा खालील खेळण्यास कशी मदत केली. “जर एखाद्या खेळाडूला दबाव हाताळायला शिकायचे असेल तर त्याने भारताविरुद्ध खेळले पाहिजे. भारत-पाकिस्तान लढतीदरम्यान दोन्ही संघांवर बराच दबाव असतो. 2012 मध्ये भारताविरुद्ध मालिकेदरम्यान दबाव कसा हाताळायचा हे मी शिकलो. दोन्ही देशांचे चाहते या सामन्यांचा आनंद घेतील पण मालिका खेळण्याचा निर्णय प्रशासनावर अवलंबून आहे,” जुनैदने क्रिकेट पाकिस्तानला सांगितले. एकेकाळी पाकिस्तान क्रिकेटमधील एक विलक्षण प्रतिभावान खेळाडू असलेला खान सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. जुनैद अखेर 2019 मध्ये इंग्लंड विरोधात पाकिस्तानकडून खेळला होता. त्याने 22 टेस्ट, 76 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने तब्बल 180 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान संघ जेव्हा-जेव्हा मैदानावर आमने-सामने येतात तेव्हा तो एक हाय-व्होल्टेज सामना ठरतो. दोन्ही संघातील खेळाडू सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि दडपणाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. राजकीय तणावामुळे दोन्ही संघ आता फक्त आयसीसी, किंवा आशियाई स्पर्धेत एकमेकांपुढे उभे राहतात. यापूर्वी भारत-पाकिस्तान संघ अखेरीस 2019 वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात आमनेसामने आले होते.