IND vs NZ: श्रेयस अय्यर-रॉस टेलर यांनी वनडेत मिळून नोंदवला अविश्वसनीय रेकॉर्ड, वनडे इतिहासात फक्त तिसऱ्यांदा घडले असे
या सामन्यात श्रेयस अय्यर आणि रॉस टेलरने नाबाद शतकी कामगिरी केली. दोन्ही खेळाडूंचे शतकांची क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) टी-20 मालिकेनंतर बुधवारी 3 सामन्यांच्या मालिकेचा पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने किवी संघाला विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य दिले होते, पण यजमान संघाला ते गाठणे कठीण झाले नाही. हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध चार विकेट्सने विजय मिळविला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात दोन्ही संघांसाठी प्रत्येकी एक शतक ठोकले गेले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने भारताकडून वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले तर न्यूझीलंडचा अनुभवी रॉस टेलर (Ross Taylor) याने नाबाद शतकी कामगिरी केली. दोन्ही खेळाडूंचे शतकांची क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना दोन्ही खेळाडूंनी डावात शतक झळकावले. अय्यर आणि टेलरच्या शतकांनी मिळून वनडे क्रिकेटमध्ये एक वेगळा विक्रम नोंदवला. (IND vs NZ 1st ODI: विराट कोहली ने केली सचिन तेंडुलकर ची बरोबरी, भारत-न्यूझीलंड सामन्यात बनलेले 'हे' 7 प्रमुख रेकॉर्डस्, पाहा)
एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील ही तिसरी वेळ आहे की दोन्ही चौथ्या स्थानावरील फलंदाजांनी शतकी कामगिरी केली. आणि सहा खेळाडूंपैकी केवळ टेलर नाबाद राहिला आहे. यापूर्वी, 2007 झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात एबी डिव्हिलियर्स (107) आणि टटेन्डा तैबू (107) धावा केल्या होत्या. यानंतर 2017 भारत आणि इंग्लंडमधील सामन्यात युवराज सिंह (150) आणि इयन मॉर्गन (102) धावा केल्या होत्या. आणि आता 2020 भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यात श्रेयस (103) आणि टेलरने नाबाद 109 धावा केल्या. शिवाय, सुमारे 16 महिन्यांनंतर, एका खेळाडूने भारतासाठी चौथ्या क्रमांकावर शतक झळकावले आणि श्रेयसने हा दुष्काळ संपवला. अय्यरने चौथ्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाची फलंदाजीची चिंताही जवळजवळ दूर केली आहे. डझनभर खेळाडूंवर प्रयत्न करण्यात आले पण अय्यर एक उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे.
हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजी करताना भारताने 348 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, टेलरच्या नाबाद शतकाच्या जोरावर किवींनी 11 चेंडूत शिल्लक असताना लक्ष्य गाठले. न्यूझीलंडचा भारताविरुद्ध हा सर्वात यशस्वी रनचेस होता.