IND vs NZ 2021 Series: न्यूझीलंड मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना मिळणार आराम! ‘हा’ तडाखेबाज खेळाडू टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाची सांभाळणार धुरा!
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. खेळाडूंनीही थकवा येत असल्याची तक्रार केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. खेळाडूंनीही थकवा येत असल्याची तक्रार केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने (BCCI) न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच होणाऱ्या या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाची (Indian Team) कमान सांभाळू शकतो, असे वृत्त समोर येत आहे. संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीसाठी राहुल पहिली पसंती असल्याचे बोर्डाच्या एका सूत्राने वृत्तसंस्था ANI ला सांगितले. सूत्राने सांगितले की, “वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. आणि केएल राहुल हा या संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि तो संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.” (IND vs NZ: भारताचा न्यूझीलंड दौरा एक वर्ष पुढे ढकलला, 2022 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळला जाईल; जाणून घ्या कारण)
यादरम्यान चांगली गोष्ट म्हणजे या मालिकेसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तथापि, यासाठी कोविड-19 ची स्थिती विचारात घेतली जाईल. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “आम्ही चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देऊ पण पूर्ण क्षमतेने नाही. स्थानिक प्रशासनाशी बोलून त्यानुसार आराखडा तयार केला जाईल.” टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत बोलताना जसप्रीत बुमराहने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बुमराह म्हणाला की, “कधीकधी तुम्हाला विश्रांतीची गरज असते. आपण सहा महिने सतत खेळत आहेस. त्यामुळे हे सर्व अनेकजण तुमच्या मनात मागे धावत आहेत. पण जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा तुम्ही त्यांचा विचार करत नाही. अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात. वेळापत्रक काय असेल आणि कोणती स्पर्धा कधी खेळली जाईल.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. 17, 19 आणि 21 नोव्हेंबर रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार असून सामने जयपूर, रांची आणि कोलकाता येथे हे सामने खेळवले जाणार आहेत. तसेच 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे.