IND vs NZ 2020: न्यूझीलंड XI विरुद्ध टूर सामन्यात भारताची खराब फलंदाजी; पृथ्वी शॉ, शुभमन गिल फेल; हनुमा विहारी ने ठोकले शतक

अवघ्या पाच धावांच्या आत भारताने तीन विकेट गमावल्यास हा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. स्कॉट कुग्गेलैनने पृथ्वी आणि शुभमनला भोपळा न फोडता तर, मयंकला 1 धावावर माघारी धाडले.

चेतेश्वर पुजारा-हनुमा विहारी (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मर्यादित षटकारांच्या खेळानंतर आता क्रिकेटच्या मोठ्या स्वरूपात आक्रमण-सामना करण्यासाठी सज्ज आहे. न्यूझीलंडच्या हॅमिल्टनमध्ये 21 फेब्रुवारीपासून दोन सामन्यांची टेस्ट मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून सलामी फलंदाज रोहित शर्मा याला दुखापतीमुळे बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेत मयंक अग्रवाल सोबत डावाची सुरुवात करण्यासाठी कोणता फलंदाज येईल यावर सध्या चर्चा रंगली आहे. यासाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शुभमन गिल (Shubman Gill) हे दोन दावेदार आहेत. पण मालिका सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध आजपासून सुरु झालेल्या टूर सामन्यात हे दोघे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. शुक्रवारी हॅमिल्टनमध्ये इंडियन्स आणि न्यूझीलंड इलेव्हनमध्ये सराव सामन्याला सुरुवात झाली. भारताने पहिले फलंदाजी करावी असे दोन्ही संघांनी ठरवले. अवघ्या पाच धावांच्या आत भारताने तीन विकेट गमावल्यास हा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. स्कॉट कुग्गेलैन याने या तीनही विकेट्स घेतल्या. (IND vs NZ Test: न्यूझीलंड टेस्ट मालिकेआधी ओपनिंग स्लॉटसाठी पृथ्वी शॉ याच्याशी स्पर्धेबाबत शुभमन गिल याने केले 'हे' मोठे विधान)

कुग्गेलैनने पृथ्वी आणि शुभमनला भोपळा न फोडता तर, मयंकला 1 धावावर माघारी धाडले. त्यानंतर आलेला टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ही डाव सावरू शकला नाही. अजिंक्यने 18 धावा केल्या आणि भारताने 38 च्या धावसंख्येवर चौथी विकेट गमावली. त्यानंतर हनुमा विहारी (Hanuma Vihari) च्या जोडीने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने टूर सामन्यात जोरदार खेळी करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. पुजारा आणि विहारीने 195 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पुजारा 93 आणि विहारी 101 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला.

दुसरीकडे, मागील काही सामान्यांपासून टीम बाहेर असलेल्या रिषभ पंतला आज खेळण्याची संधी मिळाली. पण तो या संधीचा फायदा करून घेऊ शकला नाही. पंतने 14 जानेवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. तब्बल 1 महिन्यानंतर त्याने भारताकडून फलंदाजी केली. येथे तो अपयशी ठरला आणि 10 चेंडूत 7 धावा करून परतला. भारताकडून रिद्धिमान साहा, आर अश्विन शून्यावर उमेश यादव नाबाद 9 आणि रवींद्र जडेजा 8 धावांवर परतला. टीम इंडिया पहिल्या डावात 78.5 ओव्हरमध्ये 263 धावा करून ऑलआऊट झाली.