IND vs NZ 1st Test: रॉस टेलर याचे अनोखे शतक, टीम इंडियाविरुद्ध पहिल्या सामन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास
या सामन्यात अनुभवी किवी फलंदाज रॉस टेलर याने सामन्यापूर्वीच अनोखे शतक केले आहे. टेलर आपल्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत आहे.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये (Wellington) सुरु झाला आहे. या सामन्यात अनुभवी किवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) याने सामन्यापूर्वीच अनोखे शतक केले आहे. टेलर आपल्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत आहे. भारतविरुद्ध वेलिंग्टनमध्ये सुरु असलेला पहिला कसोटी सामना टेलरच्या कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. या दरम्यान, टेलर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला फलंदाज ठरला. 35 वर्षीय टेलरने 2007 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टेलरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 15 आणि चार धावा केल्या. त्यानंतर दुसर्या सामन्यात केवळ 17 आणि आठ धावा केल्या. टेलरने आजवर खेळल्या 99 कसोटी सामन्यांमध्ये 46.28 च्या सरासरीने 7174 धावा केल्या असून यात 19 शतकं आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. (IND vs NZ 1st Test: केन विल्यमसन ने टॉस जिंकून भारताला दिले बॅटिंगचे आमंत्रण; पाहा कसा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन)
टेलर न्यूझीलंडकडून 100 कसोटी सामने खेळणारा चौथा क्रिकेटपटू बनला आहे. यासह तो स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम आणि डॅनियल व्हेटोरी यांचे एलिट यादीत सामील झाला आहे. टेलर देशासाठी कसोटी आणि वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. याशिवाय न्यूझीलंडकडून त्याच्या नावावर वनडे सामन्यात सर्वाधिक शतकांचीही नोंद आहे. दुसरीकडे, टेलरने न्यूझीलंडकडून 231 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. यात त्याने न्यूझीलंडकडून सर्वाधिक 8570 धावांची नोंद केली आहे.
दरम्यान, यापूर्वी दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या टी-20 मालिकेत 35 वर्षीय टेलरने यावर्षी 2 फेब्रुवारी रोजी माउंट मौनगुनी येथे भारताविरुद्ध 100 वा आंतरराष्ट्रीय टी -20 सामना खेळला. हा पराक्रम करणारा तो शोएब मलिक (पाकिस्तान) आणि रोहित शर्मा (भारत) नंतर तिसरा खेळाडू ठरला. जगातील अनेक क्रिकेटपटूंनी 100 हून अधिक कसोटी आणि वनडे सामने खेळले आहेत, परंतु जगात फक्त तीन क्रिकेटपटुंनी 100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.