IND vs NZ 1st Test Day 2: टॉम लॅथम-विल यंगच्या जोडीची दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडच्या बिनबाद 129 धावा; टीम इंडिया गोलंदाज विकेटसाठी तरसले
दिवसाच्या सुरुवातीला भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यावर न्यूझीलंडने टॉम लॅथम आणि विल यंग, या सलामी जोडीच्या दमदार शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने दिवसाखेर बिनबाद 129 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, बॅटने दबदबा निर्माण केलेल्या टीम इंडियाला बॉलने दुसऱ्या दिवशी फारसे काही करता आले नाही.
IND vs NZ 1st Test Day 2: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) कानपुर कसोटी (Kanpur Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यावर न्यूझीलंडने टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंग (Will Young), या सलामी जोडीच्या दमदार शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने दिवसाखेर 57 ओव्हरमध्ये बिनबाद 129 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यंग 75 धावा तर लॅथम 50 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, बॅटने दबदबा निर्माण केलेल्या टीम इंडियाला बॉलने दुसऱ्या दिवशी फारसे काही करता आले नाही. गोलंदाजांनी विकेट काढण्यासाठी संधी निर्माण केली पण त्याचा ते फायदा घेऊ शकले नाही. परिणामी संघाला पहिल्या विकेटसाठी चांगलाच परिश्रम करावा लागला. (IND vs NZ: शतकवीर श्रेयस अय्यरने वाढवले कर्णधाराचे टेंशन, विराट कोहली परतल्यास प्लेइंग इलेव्हनमधून कोण होणार आऊट)
टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 258/4 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या सुरुवातीलाच त्यांनी जडेजाच्या रूपात पाचवी विकेट गमावली. जडेजाला 50 धावांवर टिम साउदीने बोल्ड केले. त्यानंतर श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यात 157 चेंडूत शतक पूर्ण केले. भारताने दिवसाची दुसरी आणि सहावी विकेट रिद्धिमान साहाच्या रूपाने गमावली, जो एक धाव करून टॉम ब्लंडेलकडे झेलबाद झाला. साहा पाठोपाठ श्रेयसने 171 चेंडूत 105 धावा केल्या आणि साउदीच्या चेंडूवर विल यंगकडे झेलबाद झाला. भारताची आठवी विकेट अक्षर पटेलच्या रूपात पडली. पटेल अवघ्या 3 धावा करून साउदीचा बळी ठरला. न्यूझीलंडला नववे यश एजाज पटेलने आर अश्विनला 38 धावांच्या वैयक्तिक धावांवर बाद करून मिळवून दिले. भारताची शेवटची विकेट इशांत शर्माच्या रूपाने पडली, जो भोपळा न फोडता माघारी परतला. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 105 धावा चोप्ल्या. तसेच शुभमन गिलने 52 आणि रवींद्र जडेजाने 50 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, किवी संघासाठी टिम साउदीने सर्वाधिक पाच विकेट घेत भारताचा डाव आटोपला. प्रत्युत्तरात लॅथम आणि यंग यांच्या अर्धशतकी खेळीने दिवसाखेरीस भारतीय संघावर वर्चस्व गाजवले.
तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून श्रेयस अय्यरने तर किवी संघासाठी फिरकी अष्टपैलू रचिन रवींद्रने कसोटीत पदार्पण केले. या दोन नवोदित खेळाडूंबद्दल बोलायचे तर एकीकडे श्रेयसने बॅटने ठसा उमटवला मात्र, रवींद्र बॉलने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्याने 7 षटक टाकले आणि 28 धावा लुटल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.