IND vs NZ 1st ODI: पृथ्वी शॉ-मयंक अग्रवाल च्या जोडीचे न्यूझीलंडविरुद्ध डेब्यू, 44 वर्षानंतर घडला असा योगायोग, वाचा सविस्तर

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करत एकसाथ डावाची सुरुवात केली. भारतीय क्रिकेट इतिहासात एका सलामी जोडीने एकत्र आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची ही फक्त चौथी वेळ आहे. 

मयंक अग्रवाल-पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/BCCI)

तीन वनडे मालिकेचा पहिला सामना भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात बुधवारी (5 फेब्रुवारी) हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला जात आहे. दुखापतींशी झगडत असलेला भारतीय संघ या मालिकेत नव्या सलामीच्या जोडीसमवेत उतरला आहे. या मालिकेत युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करत एकसाथ डावाची सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या आदल्या दिवशी याची पुष्टी केली होती. भारतीय क्रिकेट इतिहासात एका सलामी जोडीने एकत्र आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची ही फक्त चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे 44 वर्षांपूर्वी 1976 च्या न्यूझीलंड दौर्‍यावर दिलीप वेंगसरकर आणि पार्थसारथी शर्मा यांच्या सलामी जोडीने एकत्र वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत जखमी झालेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वीला, तर न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी-20 दरम्यान जखमी झालेल्या रोहित शर्माच्या जागी मयंकला संधी देण्यात आली आहे.

यापूर्वी, केएल राहुल आणि करुण नायर यांनीदेखील एकाच सामन्यात आपली कारकीर्द सुरू केली आणि सलामीची जोडी म्हणून दोघे एकत्र आले होते. कर्नाटकच्या फलंदाजांनी जून 2016 मध्ये झिम्बाब्वेमध्ये पदार्पण केले होते. शिवाय, सुनील गावस्कर आणि सुधीर नाईक यांनीही एकाच दिवशी एकत्रित येत कारकीर्दीची सुरुवात केली होती. इतकाच नाही तर, शॉ आणि अग्रवाल पदार्पणाच्या वनडे सामन्यात पन्नास धावांची भागीदारी करणारी पहिली भारतीय सलामी जोडी बनली. परंतु त्यानंतर लवकरच त्यांना एकापाठोपाठ बाद करण्यात आले. पृथ्वीने 20 धावा केल्या, तर मयंक त्याच्या नंतरच्या ओव्हरमध्ये 31 चेंडूत 32 धावा करून बाद झाला.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना हॅमिल्टनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लाथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यापूर्वी पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 5-0 किवी संघाचा क्लीन स्वीप केला होता. विश्वचषक 2019 सेमीफायनलमधील सामन्यांनंतर दोन्ही संघात पहिल्यांदा वनडे सामना खेळला जात आहे.