IND vs ENG ODI Series 2021: मालिका विजयच नाही तर इंग्लंडला पछाडत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान होण्याची ‘विराटसेने’ला संधी

सध्या टी-20 आणि वनडे क्रमवारीत इंग्लिश टीम पहिल्या स्थानावर असून टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड 123 रेटिंग गुण आहेत तर भारत 117 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तीन वनडेनंतर टीम इंडिया नंबर-1 वनडे संघ बनू शकते.

भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG ODI Series 2021: इंग्लंड संघाला पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-2 अशा फरकाने धूळ चारल्यावर टीम इंडियाची नजर आता वनडे मालिकेवर असेल. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर दोन्ही संघात तीन सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध विजयी लय कायम ठेवण्याचा आणि आयसीसीच्या वनडे क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. सध्या टी-20 आणि वनडे क्रमवारीत इंग्लिश टीम पहिल्या स्थानावर असून टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड 123 रेटिंग गुण आहेत तर भारत 117 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्ध तीन वनडे सामन्यानंतर टीम इंडिया नंबर-1 वनडे संघ बनू शकते, पण अव्वल स्थान पटकावण्याची त्यांना इंग्लंडचा क्लीन स्वीप करावे लागेल.

या मालिकेतील तीनही सामने जिंकल्यास भारताला तीन रेटिंग गुण मिळतील आणि 120 गुणांसह वनडे क्रमवारीत ते पहिले स्थान मिळवतील. शिवाय, क्लिन स्वीपमुळे इंग्लंड केवळ एकदिवसीय सामन्यात पराभूत होणार नाही तर ते चार रेटिंग गुण देखील गमावत आणि 119 गुणांसह त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण होईल. दुसरीकडे, भारताने जर मालिका 2-1 ने जिंकली तर इंग्लंडचे वनडे क्रमवारीत पहिले स्थान कायम राहील मात्र, नक्कीच त्यांना दोन रेटिंग गुण गमावतील आणि त्यांचे 121 गुण होतील. या उलट जर इंग्लंडने मालिकेत टीम इंडियाचा सफाया केला तर वनडे रँकिंगमध्ये निश्चितच मोठा बदल होईल आणि टीम इंडिया दुसर्‍या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरेल. अशा स्थितीत, तिसर्‍या क्रमांकावर असलेला न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर झेप घेईल.

दरम्यान, घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही संघात भारतात 9 एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाने 6 आणि इंग्लंड एक मालिका जिंकली असून दोन मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत. इंग्लंडने अखेर 1984 मध्ये भारत विरुद्ध वनडे मालिका जिंकली होती. शिवाय, दोन्ही संघ 4 वर्षांनंतर द्विपक्षीय मालिकेत आमने-सामने आले असून अखेर 2017 च्या घरगुती वनडे मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला होता.