IND vs ENG 5th T20I 2021: इंग्लंडविरुद्ध Virat Kohli देणार सलामी, पहा 'रनमशीन'ची ओपनर म्हणून कामगिरी

सलामी फलंदाजी म्हणून कोहली आठव्यांदा मैदानावर उतरला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर यापूर्वी त्याने 7 वेळा ओपनर म्हणून मैदानात पाऊल ठेवले आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

IND vs ENG 5th T20I 2021: इंग्लंड (England) कर्णधार इयन मॉर्गनने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या 5व्या टी-20 सामन्यात भारताविरुद्ध (India) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 5 सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील हा अंतिम आणि निर्णायक सामना आहे कारण दोन्ही संघ सध्या मालिकेत 2-2 अशा बरोबरीत आहेत. आजच्या निर्णायक सामन्यासाठी केएल राहुलच्या जागी भारताने टी नटराजनला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. अशाप्रकारे रोहित शर्मासह कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सलामीला उतरेल. सलामी फलंदाजी म्हणून कोहली आठव्यांदा मैदानावर उतरला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर यापूर्वी त्याने 7 वेळा ओपनर म्हणून मैदानात पाऊल ठेवले आहे. यामध्ये त्याला 28.28 च्या सरासरीने आणि 146.66 च्या स्ट्राइक रेटने 198 धावाच करता आल्या आहेत. (IND vs ENG 5th T20I 2021: इंग्लडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, निर्णायक सामन्यासाठी असा आहे दोन्ही संघांचा Playing XI)

टी-20 मध्ये यापूर्वी तो अंतिम वेळी 2018 मध्ये आयर्लंड संघाविरुद्ध सलामीला आला होता. विशेष म्हणजे विराट कोहलीने 18 वेळा आयपीएलमध्ये सलामी फलंदाजाची भूमिका बजावली आहे. यादरम्यान कोहलीने 37.2 ची सरासरी आणि 142.3 च्या स्ट्राईक रेटने 595 धावा केल्या ज्यामध्ये 3 शतकांचा देखील समावेश आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेच्या प्रत्येक सामन्यात टीम इंडिया प्रत्येकी सामन्यात बदल केला आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला उतरले, त्यानंतर दुसर्‍या सामन्यात ईशान किशनला राहुलसह आघाडीला संधी दिली गेली. तिसर्‍या सामन्यात रोहित शर्माच्या आगमनाने सूर्यकुमार यादवला बाहेर करण्यात आले. चौथ्या टी-20 सामन्यात इशानच्या दुखापतीमुळे सूर्यकुमारला संघात पुन्हा संधी मिळाली आणि आता पाचव्या सामन्यात राहुलला वगळण्यात आले असून नटराजनचा समावेश करण्यात आला आहे.

पाचव्या टी-20 सामन्यासाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चाहर, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन.