IND vs ENG 2nd T20I 2021: विराट कोहलीचा तीन हजारी विक्रम! आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3000 धावा करणारा टीम इंडिया कर्णधार ठरला पहिला क्रिकेटर

कोहलीने 73 धावांच्या खेळीने इतिहास रचला आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये 3000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. विराटनंतर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd T20I 2021: इंग्लंडविरुद्ध (England) दुसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद 73 धावांची धडाकेबाज कामगिरी करत टीम इंडियाला आवश्यक विजय मिळवून दिला. यासह कोहली पुन्हा लयीत परतला आहे. यापूर्वी त्याच्या फलंदाजीबद्दल बरेच प्रश्न उपस्थित होत होते. कोहलीने 49 चेंडूच्या आपल्या अर्धशतकी खेळीत 5 चौकार व 3 षटकार लगावले. इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात कोहलीने षटकार खेचून सामना संपविला आणि भारताने (India) इंग्लंडवर 7 विकेटने मात केली. पाच सामन्यांची टी-20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) 1-1 अशी बरोबरी केली आहे.  दरम्यान, या सामन्यात कोहलीने 73 धावांच्या खेळीने इतिहास रचला आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये 3000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला हे मानाचे स्थान मिळवता आले नाही. (IND vs ENG 2nd T20I 2021: कोहलीचा ‘विराट’ कारनामा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला पहिला भारतीय तर जगातील तिसरा कर्णधार)

या सामन्यात 72 व्या धावा पूर्ण होताच कोहलीने ही मोठी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये कोहली आता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्वरूपात 3001 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये विराटने 26 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान, त्याने 84 षटकारही ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटनंतर सर्वाधिक धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल दुसऱ्या स्थानावर आहे. गप्टिलच्या अगदी पाठोपाठ भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मार्टिन गप्टिलने 2839 धावा केल्या आहेत तर रोहित शर्माने 2773 धावा केल्या आहेत.

याशिवाय कर्णधार म्हणून विराट कोहलीने 12,000 आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या आहेत. कोहलीला 3,000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी 72 धावांची गरज होती तर कर्णधार म्हणून 12,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा सर करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती. कोहलीने एकाच डावात असे दोन मोठे कारनामे केले आहे.  याशिवाय अजून एक विक्रम प्रकरणात कोहलीने आपला साथीदार रोहितला मागे टाकले आहे. विराट आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वात अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 26वे अर्धशतक झळकावले आणि 25 अर्धशतके ठोकणाऱ्या रोहितला मागे सोडले.