IND vs ENG 2nd T20I 2021: कोहलीचा ‘विराट’ कारनामा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला पहिला भारतीय तर जगातील तिसरा कर्णधार
मॉर्गनच्या इंग्लिश टीमविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात 17 धावा करताच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 12,000 धावांचा टप्पा गाठला.
IND vs ENG 2nd T20I 2021: भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) अहमदबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एक ‘विराट’ कारनामा केला जो आजवर एकाही भारतीय कर्णधाराला जमला नाही. मॉर्गनच्या इंग्लिश टीमविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात 17 धावा करताच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 12,000 धावांचा टप्पा गाठला. विराटने पहिल्यांदा 2013 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्याने 195 आंतरराष्ट्रीय सामन्यात 41 शतक आणि 49 अर्धशतकाच्या जोरावर हा मैलाचा दगड गाठला आहे. शिवाय, हा रेकॉर्ड करणारा विराट पहिला भारतीय तर जगभरात फक्त तिसरा कर्णधार आहे. विराटपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांनी ही कामगिरी केली होती. पॉन्टिंगने कर्णधार म्हणून सर्वाधिक 15440 धावा केल्या तर स्मिथने दुसऱ्या सर्वाधिक 14878 धावा केल्या आहेत. (IND vs ENG 2nd T20I 2021: टीम इंडियाची शानदार गोलंदाजी, इंग्लंडने विजयासाठी दिले 165 धावांचे लक्ष्य)
विराटने कसोटी कर्णधार म्हणून 60 सामन्यात 8998 धावा, वनडेच्या 92 सामन्यात 5395 धावा आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदी असताना 43 सामन्याच्या 41 डावात 911 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे विराटने 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कसोटी सामन्यात अखेरचे शतक झळकावले असून त्याची शतकांचे दुष्काळ संपण्याची चिन्हच दिसत नाही. यापूर्वी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट अॅडिलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 85 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर, त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत अनुक्रमे 74, 72 आणि 62 धावांची खेळी केली पण तो त्यांचे शतकात रूपांतर करू शकला नाही. दुसरीकडे, विराट आतंरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन हजार धावांचा टप्पा सर करण्यापासून आता फक्त 48 धावा दूर आहे. विराटने या सामन्यापूर्वी 2, 928 धावा केल्या आहेत तर रोहित शर्माच्या नावावर 2 773 धावा आहेत. अशास्थितीत, विराट आंतरराष्ट्रीय टी-20 तीन हजारी टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरू शकतो.
दरम्यान, भारतीय संघाने टॉस जिंकून इंग्लंडला पहिले फलंदाजीला बोलावले आणि पाहुण्या संघाने 6 विकेट गमावून 164 धावांपर्यंत मजल मारली. इयन मॉर्गनचा इंग्लिश संघ सध्या 5 सामन्यात 1-0 ने आघाडीवर सून यजमान संघ बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरला आहे.