IND vs ENG Test 2021: टेस्ट सिरीजपूर्वी ब्रिटीशांविरुद्ध अश्विनने केला कहर, 6 विकेट्स घेत विरोधी संघाला 69 धावांवर गुंडाळले (Watch Video)

त्यापूर्वी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सुट्टीचा आनंद लुटत असताना भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विनने काउंटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. अश्विनने सरे टीमसाठी खेळत समरसेटविरुद्ध दुसऱ्या डावात 27 धावा देत सहा विकेट घेतल्या आणि ब्रिटिश संघासाठी डोक्याची घंटा वाजवली.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) 4 ऑगस्टपासून टीम इंडिया (Team India) पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सुट्टीचा आनंद लुटत असताना भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) काउंटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. अश्विनने सरे टीमसाठी खेळत समरसेट  (Somerset) काउंटी क्रिकेट क्लबविरुद्ध दुसऱ्या डावात 27 धावा देत सहा विकेट घेतल्या आणि ब्रिटिश संघासाठी डोक्याची घंटा वाजवली. पहिल्या डावात गोलंदाजी आणि बॅटने निराशाा केल्यावर अश्विनने दुसऱ्या डावात समरसेटच्या फलंदाजांविरुद्ध कहर केला. काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा अनुभवी ऑफस्पिनर पूर्ण लयीत दिसला आणि त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 49 वेळा पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला. (IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध लढतीपूर्वी विराट कोहलीच्या ‘या’ प्रमुख गोलंदाजाने केले निराश, Surrey काउंटी क्रिकेट डेब्यू ठरले अपयशी)

इंग्लंड कसोटीपूर्वी सरे मध्ये एका सामन्यासाठी आलेल्या अश्विनने अवघ्या13 षटकांत 5 गडी बाद केले आणि 23 धावा दिल्या. सोमरसेटने दुसऱ्या डावात 189 धावांच्या आघाडीसह सुरुवात केली पण अश्विनने संघाच्या आघाडीच्या 3 फलंदाजांना जाळ्यात अडकवत दबाव निर्माण केला. अश्विनने दुसऱ्या डावात 6/27 अशी कामगिरी केली आणि समरसेटला 69 धावांवर गुंडाळले. मात्र तोपर्यंत सोमरसेटने 258 धावांची मजबूत आघाडी घेतली होती. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी अश्विनने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या कामगिरीने ब्रिटिश संघाला नक्कीच घाम फुटला असेल. बुधवारी दुपारच्या जेवणापर्यंत त्याने 13 ओव्हरमध्ये 23 धावा देत पाच विकेट्स घेतल्या होता आणि दुपारच्या जेवणानंतर त्याने आपल्या सहा विकेट्स पूर्ण केल्या.

दरम्यान, अश्विन यापूर्वी नॉटिंगहॅमशायर आणि वॉर्सेस्टरशायर कंट्री क्रिकेट खेळला आहे. उल्लेखनीय म्हणजे स्टीवन डेविसची विकेट घेताच अश्विनने 650 प्रथम श्रेणी विकेट्सचा पल्ला गाठला. यापूर्वी पहिल्या डावात अश्विनने 42 धावा दिल्या आणि त्याला फक्त एक विकेट मिळाली. पण दुसऱ्या डावात अश्विनने इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडवली. गेल्या महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर आर अश्विन इंग्लंडमध्ये आहे. टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड कसोटी दरम्यान 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला असून आज, गुरुवारी टीम डरहॅम येथे बायो-बबलमध्ये दाखल होईल.