IND vs ENG 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मासह ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग, विराट कोहलीने केली पुष्टी

या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले की टीम इंडिया पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या जोडीसह मैदानात उतरेल. म्हणजेच शिखर धवनला बाहेर बसावे लागेल हे यावरून स्पष्ट झाले आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

IND vs ENG 1st T20I: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) स्पष्ट केले की टीम इंडिया पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) जोडीसह मैदानात उतरेल. म्हणजेच शिखर धवनला बाहेर बसावे लागेल हे यावरून स्पष्ट झाले आहे. कोहली सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाला, “रोहित खेळणार हे तर सोपे आहे. केएल आणि रोहित सातत्याने वरच्या क्रमांकावर कामगिरी करत आहेत. जर दोघांनीही विश्रांती घेतली तर शिखर तिसरा सलामी फलंदाज आहे. रोहित आणि राहुलकडून आम्ही सुरुवात करू.” यासह कोहली म्हणाला, “आम्हाला फ्री क्रिकेट खेळायचे आहे, आमच्याकडे आता खूप आक्रमक खेळाडू आहेत. आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करीत होतो. आता तुम्ही पाहता आहात की खेळाडू खुलेपणाने फलंदाजी करतील. मी पाहतो की या मालिकेतून आम्ही आमच्या दृष्टिकोनातून बरेच मुक्त आहोत.” (IND vs ENG 1st T20I: टीम इंडियापुढे टी-20 मॅचसाठी संघ निवडीचा पेच, इंग्लंडला लढा देण्यासाठी मैदानात उतरतील खतरनाक 11, पहा संघाचा संभावित प्लेइंग इलेव्हन)

शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 खेळण्यासाठी मैदानावर उतरेल तेव्हा त्यांचे लक्ष्य या मालिकेत विजय मिळवण्यावर असून यंदा भारतात होणाऱ्या वर्ल्ड टी-20 कपसाठी योग्य संयोजन शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या मालिकेतून ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी मुख्य खेळाडू ओळखणे हे कर्णधार विराट कोहलीचे मुख्य लक्ष्य असेल. इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील नंबर एक टी-20 संघाकडून भारतीय कर्णधार चांगल्या प्रतिस्पर्ध्याची अपेक्षा करत आहे. मालिकेदरम्यान सपाट खेळपट्ट्यांवर बरीच संधी मिळण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांचा मार्ग सोपा होणार नाही. इंग्लंडचा आक्रमक विकेटकीपर फलंदाज जोस बटलर अलीकडेच म्हणाला की, “आमच्यासाठी ही मोठी संधी आहे की आम्हाला ज्या परिस्थितीत वर्ल्ड कप खेळायचा आहे त्या परिस्थितीत खेळण्याची संधी मिळत आहे.”

दरम्यान, मालिकेचे पाचही टी-20 सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जातील. शिवाय, आयपीएल 2020 मध्ये दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्यांमध्ये भुवनेश्वर कुमारचाही समावेश आहे. भुवनेश्वरने अखेर डिसेंबर 2019 मध्ये भारताकडून खेळला होता पण वरिष्ठ गोलंदाज संघाचा अविभाज्य सदस्य असल्याचे कोहलीने म्हटले आहे.