IND vs ENG Series: बुमराहच्या ‘या’ रेकॉर्डपासून युजवेंद्र चहल फक्त एक पाऊल दूर, सूर्यकुमार यादव इतिहासाच्या उंबरठ्यावर, इंग्लंड T20 मालिकेत बनू शकतात हे प्रमुख रेकॉर्ड

टी-20 मालिकेदरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंना मोठे रेकॉर्ड करण्याचीही सुवर्ण संधी असेल. यामध्ये विराट कोहलीला, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल आणि इंग्लंड ओपनर डेविड मलानचे नाव आघाडीवर आहे.

युजवेंद्र चहल आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI, Instagram)

IND vs ENG T20I Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील 5 सामन्यांच्या मालिकेचा पहिला टी-20 सामना शुक्रवारी अहमदाबादच्या (Ahmedabad) जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यापूर्वी या दोन्ही संघांमध्ये 4 सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका रंगली होती ज्यामध्ये यजमान टीम इंडियाने (Team India) 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा (Indian Team) उत्साह शिगेला पोहोचला आहे तर इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला टर्निंग ट्रॅकची भीती लागून असेल. 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेदरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंना मोठे रेकॉर्ड करण्याचीही सुवर्ण संधी असेल. यामध्ये भारतीय कर्णधार कोहली (Virat Kohli), उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) यांचे नाव आघाडीवर आहे. (IND vs ENG 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मासह ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग, विराट कोहलीने केली पुष्टी)

विराट कोहली पहिला 3 हजारी बनू शकतो

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कोहली 3000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू बनू शकतो. भारतीय कर्णधाराने आतापर्यंत 85 टी-20 सामन्यात एकूण 2928 धावा केल्या असून तो तीन हजाराच्या आकड्यापासून अवघ्या 72 धावा दूर आहे. शिवाय, मालिकेत 17 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 12000 धावा करणारा विराट जगातील तिसरा कर्णधार ठरेल.

रोहित शर्मा मार्टिन गप्टिलला मागे टाकू शकतो

'हिटमॅन' रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत 13 षटकार ठोकला तर तो न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या पुढे जाईल. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गप्टिलच्या नावावर आहे. गुप्टिलने आतापर्यंत 139 तर रोहितने 127 षटकार ठोकले आहेत.

जसप्रीत बुमराहच्या पुढे जाण्याची युजवेंद्र चहलला संधी

टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 59 विकेट्स घेतल्या आहेत. चहल आणि पेसर जसप्रीत बुमराह यांनी एकूण 59 विकेट घेतल्या असून इंग्लंडविरुद्ध मालिकेत चहलला बुमराहला मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे.

सूर्यकुमार यादव ऐतिहासिक डेब्यूच्या उंबरठ्यावर

सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्यास तो 100 आयपीएल सामने खेळल्यानंतर भारतासाठी पदार्पण करणारा एकमेव क्रिकेटपटू ठरेल. सूर्यकुमार आयपीएलमध्ये आतापर्यंत 101 सामने खेळला आहे.

डेविड मलानच्या निशाण्यावर बाबर आझमचा रेकॉर्ड

मालनने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 19 डावात 855 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये आणखी 145 धावा केल्यास तो क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात 1000 धावा करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजमने 26 डावात ही कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले होते.

दुसरीकडे, आयसीसी टी-20 संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लिश टीमविरुद्ध क्लीन-स्वीप किंवा 4-1 असा विजय मिळवल्यास भारतीय संघाला क्रमवारीत झेप घेत मानाचे स्थान पटकण्याचीही संधी आहे.