IND vs BAN 1st Test Day 1: इंदोर टेस्टमध्ये आर अश्विन याची विक्रमी कामगिरी; अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्यासह 'या' खास क्लबमध्ये झाला समावेश

आणि ही कामगिरी करणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज आहे. आर अश्विनने बंगालदेसविरुद्ध पहिल्या सामन्यात मोमिनुल हक याला बाद करत घरच्या मैदानावर 250 विकेट घेण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. 

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील पहिला टेस्ट सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि हिटमन रोहित शर्मा याच्याकडे अनेक विक्रम करण्यावर लक्ष असेल, पण त्यापूर्वी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने एका विक्रमाची नोंद केली आहे. आणि ही कामगिरी करणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज आहे. आर अश्विनने बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात मोमिनुल हक याला बाद करत घरच्या मैदानावर 250 विकेट घेण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी केवळ महान फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी ही कामगिरी केली आहे. या बाबतीत कुंबळे आघाडीवर आहे. कुंबळेने भारतात खेळताना सर्वाधिक 350 विकेट घेतले आहेत, तर हरभजनने 265 टेस्ट विकेट घेतले आहेत. आता अश्विनची नजर हरभजनच्या 265 विकेटचा रेकॉर्ड मोडण्याकडे असेल. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्विनने 357 विकेट घेतले आहेत. कुंबळे 619 विकेटसह प्रथम स्थानावर आहे आणि हरभजनच्या नावावर 417 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. या दशकात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे.

विदेशी भूमीवर अश्विनने 31.39 च्या सरासरीने एकूण 108 विकेट्स घेतल्या आहेत. नुकत्याच दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि सर्वात जलद 350 कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याची बरोबरी केली. मुरलीधरन आणि अश्विन दोघांनीही 66 कसोटीत 350 विकेट घेतले आहेत. महत्वाचे म्हणजे अश्विनने कुंबळेला घरच्या मैदानावर खेळताना सर्वात जलद 250 टेस्ट विकेट घेण्याच्या बाबतीतही मागे टाकले आहे. अश्विनने 42, तर कुंबळेने 43 मॅचमध्ये 250 विकेट घेतल्या आहेत. शिवाय, मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांचीही बरोबरी केली. मुरलीधरन आणि अश्विनने42 सामन्यात250 टेस्ट विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

दोन्ही संघांमधील कसोटी रेकॉर्डबद्दल बोलले तर, भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 9 कसोटी सामन्यांपैकी टीम इंडियाने सात सामने जिंकले आहेत, आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजे बांग्लादेश अद्याप कसोटी सामन्यात भारताला पराभूत करू शकलेला नाही.