IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याला विराट कोहली याची बरोबरी करण्यासह 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड पुन्हा नोंदवण्याची संधी, वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत कोहली सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि विराटला मागे ठेवून पुहा विश्वविक्रम नोंदवण्यापासून 'हिटमॅन' अवघ्या आठ धावा दूर आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध रविवार, 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची कमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या ताब्यात देण्यात आली आहे. रोहित केवळ वनडे किंवा टी-20 मध्येच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्येही धावा ठोकत आहे. आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये रोहितने पाच शतकं ठोकून इतिहास रचला, तर दक्षिण आफ्रिकाविरूद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या कसोटी मालिकेतही त्याने तीन सामन्यांमध्ये 529 धावा केल्या. यात एक दुहेरी शतक आणि दोन शतकांचा समावेश आहे. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात रोहितला विश्वविक्रम करण्याची संधी मिळेल आणि तेही नियमित कर्णधार कोहलीला मागे टाकून. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत कोहली सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीने 72 सामन्यात 2450 धावा नोंदल्या आहेत. कोहलीने टी -20 क्रिकेटमध्ये 22 अर्धशतकंही केली आहेत. रोहित या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि विराटला मागे ठेवून पुहा विश्वविक्रम नोंदवण्यापासून 'हिटमॅन' अवघ्या आठ धावा दूर आहे. रोहितने 98 टी-20 सामन्यात 2443 धावा केल्या आहेत. (IND vs BAN 1st T20I: पहिल्या टी-20 पूर्वी दिल्लीच्या हवा प्रदूषणावर रोहित शर्मा याने दिले 'हे' मजेदार उत्तर, सर्वांना झाले हसू अनावर, पाहा Video)

इतकेच नाही तर, पहिल्या टी-20 मॅचमध्ये रोहित विराट आणि माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची बरोबरीदेखील करू शकतो. विराटने टी-20 मध्ये सर्वाधिक 22 अर्धशतकं केली आहेत, तर रोहित 21 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये रोहित 50 किंवा अधिक धावा करत या यादीत फलंदाजांमध्ये विराटची बरोबरी करेल आणि संयुक्त रूपात पहिल्या क्रमांकावर पोहचेल. दुसरीकडे, 3 नोव्हेंबरला होणार सामना रोहितचा 99 वा टी-20 सामना असेल. यासह तो माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीची बरोबरी साधेल. आफ्रिदीनेही 99 टी-20 सामने खेळले आहेत. सध्या रोहितने 98 टी-20 मॅचसह महेंद्र सिंह धोनी यांची बरोबरी केली आहे. दरम्यान, माजी पाकिस्तानी अष्टपैलू शोएब मलिक याने सर्वाधीक 111 टी-20 मॅच खेळले आहेत. याशिवाय, टी-20 क्रिकेटमधील 2500 धावांचा टप्पा गाठण्यापासून रोहित अवघ्या 57 धावा दूर आहे.

बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना रोहितच्या पायावर जोरदार दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने पहिला सामान खेळणे अनिश्चित झाले होते. मात्र, नंतर संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले की पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी रोहित पूर्णपणे फिट आहे.