IND vs AUS 2020-21: टीम इंडियाला आणखी एक दुखापतीचा झटका, केएल राहुलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन टेस्ट मॅचमधून माघार

मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यानंतर आता केएल राहुलने दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने नुकतंच राहुलच्या दुखापतीविषयी आपल्या निवेदनात जाहीर केलं. सराव सत्राच्या वेळी फलंदाजी करताना केएल राहुलच्या डाव्या मनगटात लचक भरली.

केएल राहुल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2020-21: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि टीम इंडिया (Team India) सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेत तिसऱ्या कसोटी सामन्यात आमने-सामने येणार आहेत. पण, त्यापूर्वी संघासाठी चिंतेची बाब म्हणजे संघातील खेळाडूंच्या दुखापतीत वाढ होत आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यानंतर आता केएल राहुलने (KL Rahul) दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) नुकतंच राहुलच्या दुखापतीविषयी आपल्या निवेदनात जाहीर केलं. "शनिवारी टीम इंडियाच्या सराव सत्राच्या वेळी एमसीजीत नेटमध्ये फलंदाजी करताना केएल राहुलच्या डाव्या मनगटात लचक भरली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी यष्टिरक्षक-फलंदाज उपलब्ध होणार नाही कारण त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी व पुन्हा फिटनेस मिळविण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा अवधी लागेल." (IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्ट मॅचसाठी असा असेल टीम इंडियाचा Playing XI, पहा कोणाला मिळेल संघात स्थान)

बीसीसीआयने दिलेल्या निवेदनानुसार राहुल आता मायदेशी परतणार असून दुखापतीच्या पुढील पुनर्वसनासाठी बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र सुरु झाले. रवींद्र जडेजा, शमी आणि उमेश यादव यांना देखील कांगारू संघाविरुद्ध मालिकेदरम्यान दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. जडेजाला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अखेरच्या दोन टी-20 आणि पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड टेस्टच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मोहम्मद शमीच्या मनगटाला फ्रॅक्चर झाला, तर उमेश यादवलाही दुसर्‍या कसोटीनंतर हॅमस्ट्रिंगमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले. रोहित शर्माला देखील पुन्हा संघात प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण मर्यादित ओव्हरची मालिका आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते.

हनुमा विहारीच्या अपयशानंतर राहुल कसोटी इलेव्हनमध्ये कमबॅक करण्याच्या जवळ असल्याने त्याची दुखापत भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये विहारीने 45 धावा केल्या आहेत. अ‍ॅडिलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यात 36 धावांच्या कमी स्कोरनंतर भारताने जबरदस्त पुनरागमन केले आणि बोर्डर-गावस्कर ट्रॉफीत 1-1 अशी बरोबरी साधली.