IPL Auction 2025 Live

IND vs AUS: विराट कोहली नाही तर 'या' फलंदाजाने टीम इंडियासाठी वनडेत 2020 मध्ये केल्या सर्वाधिक धावा, रोहित शर्माने न खेळता रचला अनोखा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी 2020 रोजी रोहितच्या 119 धावांचा डाव भारतीय फलंदाजाचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2020चा सर्वोच्च डाव आहे. शिवाय, यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाला (Indian Team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नुकत्याच संपुष्टात आलेल्या वनडे मालिकेत 2-1ने पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला मुकला असला तरी टीम इंडियाचा नियमित सलामी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) 50 ओव्हर क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम रचला. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत भारताचा एकही फलंदाज तीन आकडी धावा गाठू शकला नसल्यामुळे ‘हिटमन’ने 2020 मध्ये भारतासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या (Highest ODI Score for India in 2020) नोंदवली आहे. 19, जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोरमधील (Bangalore) रोहितच्या 119 धावांचा डाव भारतीय फलंदाजाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2020चा सर्वोच्च डाव आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत हार्दिक पांड्याने सर्वाधिक 92 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, रोहितने आतापर्यंत सलग आठ वर्षे भारतीय खेळाडूने केलेली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे. (IND v AUS ODI 2020: वनडे मालिका गमावली पण टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'या' 5 गोष्टी ठरल्या फायदेमंद)

शिवाय, यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाही केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने 9 सामन्यात 443 धावा तर कोहलीने त्याच्याहून दोन धावा कमी म्हणजे 441 धावा केल्या आहेत. त्यांच्यानंतर यादीत तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर आहे ज्याने तितक्याच सामन्यात 331 धावा केल्या. एकूणच यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने अव्वल स्थान पटकावलं आहे. कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या 2020 मध्ये फिंचने एकूण 13 सामने खेळले असून त्यात सर्वात 673 धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथने 10 सामन्यात 568 धावा केल्या आणि तो दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच खेळाडूंमध्ये चार ऑस्ट्रेलियन फलंदाज असून एका भारतीय म्हणून राहुलचा समावेश आहे.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे आयपीएल 2020 दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या मर्यादित ओव्हरच्या मालिकेतून वगळण्यात आले. मात्र, त्याचा कसोटी संघात समावेश केला असून त्याच्या खेळण्यावर अद्यापही संभ्रम कायम आहे. रोहित सध्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी बेंगलोरमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहे.