Ind vs Aus, 3rd T20I: हैद्राबादमध्ये ऑफलाइन तिकीट खरेदी करण्यासाठी जवळजवळ 30,000 चाहत्यांचा गोंधळ; झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी (Watch Video)

तसेच काल रात्रीपर्यंत ऑफलाइन तिकिटांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. अशा स्थितीत अचानक ऑफलाईन तिकीट विक्रीचा निर्णय घेतल्याने एवढी मोठी गर्दी जमली.

ऑफलाइन तिकीट खरेदी करण्यासाठी गर्दी (संग्रहित संपादित प्रतिमा)

हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Ind vs Aus, 3rd T20I) खेळवला जाणार आहे. 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी तिकीटविक्रीवरून बराच गदारोळ माजला आहे. या सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी जिमखाना मैदानाबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. तिकीट विक्रीदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला व त्यामुळे चेंगराचेंगरीही झाली. अशा स्थितीत क्रिकेटप्रेमींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत.

सध्या या गोंधळाचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट मिळवण्यासाठी चाहते रात्रभर जिमखाना मैदानाबाहेर रांगेत उभे होते. काही ट्विटनुसार, चाहते जवळपास 12 तास रांगेत त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत होते. या प्रचंड गर्दीमुळे शहरात जामही झाला होता. त्यानंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

आज सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट विक्रीला सुरुवात झाली आणि बघता बघता गर्दी वाढू लागली. मात्र गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सोशल मिडियावर निषेध केला जात आहे. यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की डिसेंबर 2019 पासून हैदराबादमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. त्यामुळे या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. (हेही वाचा: मोहालीमध्ये हारल्यानंतर नागपूरमध्ये पोहोचली टीम इंडिया, चाहत्यांनी केले असे स्वागत, पहा व्हिडिओ)

या सामन्याची ऑनलाइन तिकीट विक्री काही वेळेतच बंद करण्यात आली. तसेच काल रात्रीपर्यंत ऑफलाइन तिकिटांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.  अशा स्थितीत अचानक ऑफलाईन तिकीट विक्रीचा निर्णय घेतल्याने एवढी मोठी गर्दी जमली. याबाबत सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप व्यक्त होत आहे. लोक ट्विट करून एचसीए आणि त्याच्या व्यवस्थापनावर टीका करत आहेत.

दरम्यान, मोहालीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने चार विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. दुसरा टी-20 सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.