IND vs AUS 2nd Test: टिम पेनने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियासाठी शुभमन गिल, मोहम्मद सिराजचा डेब्यू

आजपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात टिम पेनने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज मेलबर्नमध्ये डेब्यू करतील.

टिम पेन आणि अजिंक्य रहाणे (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS 2nd Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी आजपासून भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आमने-सामने येत आहेत. पारंपारिकपणे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आजपासून दोन्ही संघात बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅच खेळली जाणार आहे. भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणे तर टिम पेन (Tim Paine) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात टिम पेनने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी सामन्यापूर्वीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहेत ज्यात कांगारू संघाने कोणताही बदल केलेला नाही तर टीम इंडिया इलेव्हनमध्ये चार बदल पाहायला मिळत आहे. भारताकडून शुभमन गिल (Shubman Gill) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) मेलबर्नमध्ये डेब्यू करतील तर पृथ्वी शॉ आणि रिद्धिमान साहा यांना बाहेर केले आहेत. शिवाय, रवींद्र जडेजाचा अष्टपैलू आणि रिषभ पंतचा मधल्या फळीत विकेटकीपर-फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेवर नेतृत्वाची तर शमीच्या जागी जसप्रीत बुमराहवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. (IND vs AUS 2nd Test Day 1 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड ओव्हलमधील त्यांच्या विजयी संयोजनात कोणताही बदल केलेला नाही. डेविड वॉर्नर अद्यापही दुखापतीतून सावरलेला नसल्याने जो बर्न्ससह मॅथ्यू वेड सलामीला मैदानात उतरेल. स्टिव्ह स्मिथ पुन्हा एकदा त्याच्या मेलबर्न ग्राउंडवर खेळणार असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मार्नस लाबूशेनने मागील सामन्यात प्रभावी फलंदाजी केली होती, त्यामुळे यंदा तो आपला फॉर्म कायम ठेवत आपला सर्वोत्तम डाव खेळण्याच्या प्रयत्नात असेल. गोलंदाजी विभागात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडचे त्रिकुट भारतीय फलंदाजांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. नॅथन लायन संघात एकमेव फिरकीपटू आहे.

पाहा भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.