IND vs AUS 100th Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100व्या टेस्ट मॅचसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात, 'या' संघाविरुद्ध खेळले सर्वाधिक कसोटी सामने

दोन्ही संघांनी कसोटी सामन्यात शंभरी गाठली आहे. होय, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे टेस्ट मॅच दोन्ही संघाच्या इतिहासातील 100वी टेस्ट मॅच आहे.

टीम इंडिया (Photo Credit: IANS)

IND vs AUS 100th Test 2020: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) आजपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघ (Indian Team) पहिले गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. शिवाय, हा सामना ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतासाठी (India) आणखी खास आहे. दोन्ही संघांनी कसोटी सामन्यात शंभरी गाठली आहे. होय, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे टेस्ट मॅच दोन्ही संघाच्या इतिहासातील 100वी टेस्ट मॅच आहे. टीम इंडियाने (Team India) कांगारू संघाविरुद्ध 99 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात संघाने 28 सामने जिंकले असून 43 सामने गमावले आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलिया भारतीय कसोटी इतिहासातील दुसरा देश आहे ज्याच्याविरुद्ध त्याने शंभरीचा आकडा गाठला आहे. भारताने 13 सामन्यांपैकी तीन आणि ऑस्ट्रेलियाने 8 बॉक्सिंग डे कसोटी जिंकले आहेत तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. यापूर्वी, भारताने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे मॅचमध्ये 137 धावांनी विजय नोंदविला होता. (IND vs AUS 2nd Test: टिम पेनने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियासाठी शुभमन गिल, मोहम्मद सिराजचा डेब्यू)

दुसरीकडे, टीम इंडियाने आजवर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 122 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध 98, पाकिस्तानविरुद्ध 59, न्यूझीलंड 59, श्रीलंकेविरुद्ध 44, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 39, बांग्लादेशविरुद्ध 11, झिम्बाब्वेविरुद्ध 11 आणि अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 543 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 157 सामने जिंकले आहेत, तर 168 सामने गमावले आहेत, एक सामना टाय आणि 217 सामने अनिर्णित आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील भारत तिसरा देश आहे ज्याच्याविरुद्ध त्याने 100 कसोटी सामन्यांचा आकडा गाठला आहे. कांगारू संघाने इंग्लंडविरुद्ध 351 आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 116 असे शंभरहून अधिक टेस्ट मॅचेस खेळले आहेत.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध 8 विकेटने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या टेस्ट सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर भारतीय इलेव्हनमध्ये चार बदल झालेले आहेत. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज कसोटी पदार्पण करत असून रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, पृथ्वी शॉ आणि रिद्धिमान साहा यांना आभार केले गेले आहे.