IND vs AUS 2020: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर; अ‍ॅडिलेड मैदानावर खेळला जाणार एकमेव डे-नाईट टेस्ट

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 3 डिसेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. यजमान ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 1988 नंतर एकही सामना गमावलेला नाही.

टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसच्या संकट काळात टी-20 च्या आयोजनावर संभ्रम असताना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील वर्षाखेरीस खेळल्या जाणाऱ्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. टीम इंडिया डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी 2018-19 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय टीमने विराट कोहलीच्या नेतृत्वात ऐतिहासिक टेस्ट मालिका 2-1 अशी जिंकली. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 3 डिसेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळला जाईल. या दौऱ्यावर पहिल्यांदा दोन्ही टीममध्ये डे-नाईट कसोटी (Day/Night Test) सामन्याचेही आयोजन केले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या 7News ने दिलेल्या वृत्तानुसार अ‍ॅडिलेडमध्ये (Adelaide) हा सामना रंगेल. भारताने मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळला होता. (Coronavirus: भारतीय संघाच्या 2020-21 ऑस्ट्रेलिया दौर्‍यासंदर्भात BCCI चे मोठे विधान, टीम इंडिया दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन होण्यास तयार)

यानंतर 11 डिसेंबरपासून अ‍ॅडिलेडमध्ये दुसरी कसोटी सामना होणार आहे. तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न (Melbourne) येथे होईल.मालिकेचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी (Sydney) येथे खेळला जाईल. भारत मालिकेचा पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळणार आहे, जो विराट सेनेसाठी परीक्षेपेक्षा कमी नसेल. यजमान ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 1988 नंतर एकही सामना गमावलेला नाही. शिवाय, दुसऱ्या सामन्यात भारतीय टीम डलेड डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा नाबाद रेकॉर्ड संपविण्याचा प्रयत्न करेल. भारत यंदा पर्थमध्ये खेळणार नाही, जिथे 2018-19 दौऱ्या दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, भारतासमोर यंदा ऑस्ट्रेलियाच्या रूपात मोठे आव्हान असणार आहे, कारण यंदा ते पूर्ण ताकदीने भारताचा सामना करतील. भारताने 2018-19 मध्ये कसोटी मालिका जिंकली होती, परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ त्या मालिकेत खेळले नव्हते. पण, यंदा त्यांची उपस्थिती निश्चित असल्याने भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरातपराभवकरणे सोपे होणार नाही. तसे, नुकत्याच भारताच्या न्यूझीलंड दौर्‍यावर नजर टाकल्यास, चाहते निराश होतील कारण खूप मजबूत असूनही टीम इंडियाला 0-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.