IND vs AUS 1st Test Day 1: विराट कोहलीचे दमदार अर्धशतक, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अचूक मारा; भारत पहिल्या दिवसाखेर 6 बाद 233 धावा

रिद्धिमान साहा नाबाद 9 धावा आणि रविचंद्रन अश्विन 15 नाबाद 9 धावा करून परतले.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 1: यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) आजपासून सुरु झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर भारताची (India) धावसंख्या 6 बाद 233 धावा अशी आहे.कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सर्वाधिक 74 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 42 धावा केल्या.  रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) नाबाद 9 धावा आणि रविचंद्रन अश्विन 15 नाबाद 9 धावा करून परतले. पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या मधल्या फळीने कांगारू गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. चेतेश्वर पुजाराने विराटला चांगली साथ दिली आणि अर्धशतकी भागीदारी केली. पुजाराने चांगली सुरुवात केली, पण त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. पुजाराने 43 धावा केल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी संघासाठी सकारात्मक सुरुवात केली, पण विराटची पुजारा आणि नंतर रहाणेसोबतच्या भागीदारीपुढे गुडघे टेकले. मात्र, विराटला धावबाद करत नियमित अंतराने विकेट घेत गोलंदाजांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) सर्वाधिक 2 तर पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 1st Test: रिकी पॉन्टिंग गुरुजी बोलले आणि काही मिनिटांतच Prithvi Shaw क्लीन बोल्ड होऊन माघारी, पाहून व्हाल चकित Watch Video)

अ‍ॅडिलेड येथील पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी ठरला आणि भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर पुजारा आणि मयंक डाव सावरण्याचा प्रयत्न करताना स्टार्कने सलामी फलंदाजांचा त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला. मात्र, पुजारा आणि विराटने संयमी खेळी करत 68 धावांची भागीदारी करत संघाला शंभरी गाठून दिली. लायनच्या फिरकीवर पुजारा फसला आणि मार्नस लाबूशेनकडे स्लिपमध्ये कॅच आऊट झाला. या दरम्यान, अ‍ॅडिलेडवर विराटने यशस्वी कामगिरी सुरूच ठेवली आणि 23वे अर्धशतक ठोकले. विराट आणि रहाणेने आक्रमक फलंदाजी केली आणि धावसंख्येचा वेग वाढवला. कोहली यंदाच्या वर्षातील पहिले शतक झळकावणार असे दिसताना रहाणेसोबत चोरटी धाव घेताना झालेल्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. कोहली-रहाणेमध्ये 88 धावांची भागीदारी झाली. विराट बाद होताच चार ओव्हरनंतर स्टारने भारतीय उपकर्णधार रहाणेले पायचीत करून माघारी धाडलं. रहाणेने 42 धावा केल्या. विराट बाद होताच संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. हेझलवूडने हनुमा विहारीला 16 धावांवर एलबीडब्ल्यू करून परतीचा मार्ग दाखवला.

भारत-ऑस्ट्रेलियामधील हा पहिला दिवस/रात्र सामना आहेत, तर विराटसेना पहिल्यांदा विदेशात गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळत आहे. विशेष म्हणजे भारताचा हा दुसरा तर ऑस्ट्रेलियाचा आठवा पिंक-बॉल टेस्ट सामना आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे कांगारू संघाने आजवर खेळलेले सर्व डे/नाईट सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.



संबंधित बातम्या