IND vs AUS 1st T20I:युजवेंद्र चहल, टी नटराजनच्या जाळयात अडकले कांगारू; कॅनबेरामध्ये 11 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाची मालिकेत 1-0 ने आघाडी

ऑस्ट्रेलियन फलंदाज युजवेंद्र चहलच्या फिरकीमध्ये फसले आणि 7 विकेट गमावून 150 धावांपर्यंतच मजल मारू शकले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st T20I: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) कॅनबेरा (Canberra) येथील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने (India) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 11 धावांनी रोमांचक विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतासाठी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारली, पण ऑस्ट्रेलियन फलंदाज युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) फिरकीमध्ये फसले आणि 7 विकेट गमावून 150 धावांपर्यंतच मजल मारू शकले. यजमान ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) 35 धावा, डार्सी शॉर्टने 34 धावा केल्या तर मोईसेस हेनरिक्सने 30 धावांचे योगदान दिले, पण ते संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसे पडले नाही. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताकडून चहल आणि टी नटराजन (T Natarajan) यांनी प्रत्येकी 3 तर दीपक चाहरला 1 विकेट मिळाली. मालिकेतील पुढील सामना 6 डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. (IND vs AUS 1st T20I: Mitchell Swepson याचा विराट कोहली ऑस्ट्रेलियामधील बनला पहिला शिकार, पाहून टीम इंडिया कर्णधाराने दिली अशी प्रतिक्रिया)

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच आणि शॉर्टच्या जोडीने शानदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. टीम इंडियाकडून यादरम्यान गलथान क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले सोपे झेल आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जीवदान मिळाले. पण जडेजाची बदली म्हणून मैदानावर आलेल्या चहलने सलामी जोडी मोडली आणि फिंचला 35 धावांवर माघारी धाडलं. चहलने नंतर स्टिव्ह स्मिथला बाद करून संघाला दमदार पुनरागमन करून दिलं. चहलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्मिथ माघारी परतला. नटराजनने ग्लेन मॅक्सवेलला एलबीडब्ल्यू बाद करत पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेट घेतली. यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शॉर्ट हार्दिक पांड्याकडे झेलबाद झाला. मॅथ्यू वेड देखील मोठा डाव खेळू शकला नाही आणि चहलच्या चेंडूवर कॅच आऊट होऊन परतला.

यापूर्वी, टॉस गमावून पहिले फलंदाजी करत केएल राहुलने सर्वाधिक 51 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 44 धावा केल्या. यजमान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखले, पण जडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.