IND VS AFG, T20 World Cup 2021: पहिल्या विजयासाठी टीम इंडियाला उचलावी लागणार ही ‘4’ पावले, अन्यथा विश्वचषकात होणार खेळ खल्लास!
टीम इंडियासाठी हा ‘करो किंवा मरो’चा सामना आहे. या सामन्यातही पराभव झाला तर भारताचा प्रवास संपुष्टात येईल. तथापि जर टीम इंडियाने या सामन्यात बाजी मारली तर कुठेतरी त्याच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित राहतील.
ICC T20 विश्वचषक 2021 च्या 33व्या सामन्यात भारत (India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) आमनेसामने येणार आहेत. पहिले दोन सामने गमावलेल्या टीम इंडियासाठी (Team India) हा ‘करो किंवा मरो’चा सामना आहे. या सामन्यातही पराभव झाला तर भारताचा प्रवास संपुष्टात येईल. तथापि जर टीम इंडियाने या सामन्यात बाजी मारली तर कुठेतरी त्याच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित राहतील. दुसरीकडे अफगाणिस्तान संघासाठी देखील उपांत्य फेरीत धडक मारण्याची मोठी संधी आहे. मोहम्मद नबीच्या संघाला स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्याला भारताला पराभवाची धूळ चारणे गरजेचे आहे. अफगाणिस्तान संघ सध्या जबरदस्त लयीत असून त्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला (Indian Team) अफगाणिस्तानला पराभूत करणे सोपे होणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला पहिला विजय मिळवण्यासाठी ‘ही’ 4 पावले उचलणे आवश्यक आहे. (IND vs AFG, T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा ‘हा’ खेळाडू ठरला आहे टीम इंडियावर भारी, ‘करो या मरो’च्या सामन्यात घेणार विराट ब्रिगेडचा समाचार!)
1. टीम इंडियासाठी पहिले पाऊल म्हणजे रोहित शर्माला (Rohit Sharma) दुसरा सलामीवीर बनवणे असेल. न्यूझीलंडविरुद्ध रोहित तिसऱ्या क्रमांकावर उतरला होता. यामुळे टीम इंडियाच्या रणनीतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सलामीवीर म्हणून चार टी-20 शतके झळकावणारा रोहित शर्मा सलामीला सर्वोत्तम खेळ दाखवतो. केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित या जोडीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत, अशा परिस्थितीत टीम इंडियाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करण्याची गरज आहे.
2. भारतीय संघाला केएल राहुलची भूमिका बदलण्याची गरज आहे. टीम इंडियामध्ये जर कोणी फलंदाज सर्वोत्तम फॉर्ममध्ये असेल तर तो राहुल आहे. मात्र आक्रमक फलंदाजीमुळे राहुल आपली विकेट गमावत आहे. राहुलला सावधगिरी बाळगावी लागेल आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला त्याप्रमाणे फलंदाजी करणे गरजेचे आहे.
3. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी अतिरिक्त जोखीम घेणे टाळणे आवश्यक आहे. गेल्या सामन्यात विराट मोठा फटका खेळून बाद झाला. त्याचबरोबर सूर्यकुमारला देखील डावाच्या सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावणे आवश्यक आहे. विशेषत: टीम इंडियाने पहिले फलंदाजी केली तर ही रणनीती अवलंबणे अत्यावश्यक आहे. इंग्लंड संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या 10 षटकांत अतिशय संथ फलंदाजी केली होती, पण पुढच्या 10 षटकांत त्यांनी 110 हून अधिक धावा केल्या.
4. टीम इंडियाला त्यांच्या गोलंदाजीत थोडी विविधता आणावी लागेल. लेगस्पिनर राहुल चाहर आणि अश्विन यांना टीम इंडियाने आतापर्यंत संधी दिलेली नाही. चाहर हा लेगस्पिनर असून तो मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवू शकतो. दुसरीकडे अश्विनकडे अनुभवी असून प्रत्येक खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. अश्विनच्या अनुभवाचा फायदा घेणे खूप महत्त्वाचे आहे.