IND A vs NZ A Unofficial Test: न्यूझीलंडमध्ये शुभमन गिल ने ठोकले सलग दुसरे शतक, किवी अ विरुद्ध भारत मजबूत स्थितीत
न्यूझीलंड-अ कडून ब्लेअर टिकनरने एक विकेट घेतली.
शुभमन गिल (Shubman Gill) च्या नाबाद 107, कर्णधार हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने भारत-अ (India A) ने न्यूझीलंड-अ विरुद्ध दुसऱ्या अनधिकृत टेस्ट (Unofficial Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी पहिल्या डावात एका विकेट गमावून 234 धावा केल्या. न्यूझीलंड-अ (New Zealand A) ने पहिला डाव 9 विकेट्स गमावून 386 धावांवर घोषित केला होता. भारत-अ सध्या न्यूझीलंडच्या नऊ विकेट शिल्लक असताना 152 धावा मागे आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळ संपला तेव्हा गिल 153 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार, तर पुजाराने 99 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 52 धावांची खेळी केली होती. सध्या दोन फलंदाजांमध्ये दुसर्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी झाली आहे. कर्णधार हनुमाने 73 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने 59 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंड-अ कडून ब्लेअर टिकनरने एक विकेट घेतली. तत्पूर्वी, यजमान संघाकडून डेरेल मिशेलने 222 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली.
न्यूझीलंडमध्ये शुबमनचा फॉर्म मजबूत आहे आणि दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत तो डावाची सुरुवात करू शकतो असे दिसत आहे. शुभमनचे न्यूझीलंडमधील हे सलग दुसरे शतक ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने डाव घोषित केल्यावर शुभमन आणि विहारीने चांगली सुरुवात केली. कर्णधार विहारी 59 धावांवर बाद झाला. त्यानंतर सामन्याच्या तिसर्या दिवशी खेळ संपेपर्यंत शुभमन आणि पुजारा नाबाद परतले.
शुभमनने 148 चेंडूत शतक पूर्ण केले, तर 153 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 107 धावा करून परतला. यापूर्वी, भारताकडून मोहम्मद सिराज, आर अश्विन, संदीप वॉरिअर आणि अवेश खान यांनी 2-2 विकेट्स मिळविली. या अनधिकृत कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात शुभमनने पहिल्या डावात 83 आणि दुसऱ्या डावात नाबाद 204 धावा केल्या होत्या. भारतीय संघ 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड दौर्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून सलामीवीर रोहित शर्मा बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत संघातील शेवटच्या तीन मालिकांसाठी निवडलेल्या शुभमनला सलामी फलंदाज मयंक अगरवालसह भारतीय डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकेल.