ICC WTC 2021 Final Qualification Scenarios: इंग्लंडविरुद्ध पराभवाने बदलले टेस्ट चॅम्पियनशिपचे गणित, WTC फायनलसाठी टीम इंडिया कसे करणार क्वालिफाय
या विजयासह इंग्लंडने भारताला खाली ढकलत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले. भारतीय संघासाठी अद्याप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात प्रवेश करण्याची त्यांना चांगली संधी आहे.
WTC 2021 Final Qualification scenarios: चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत जो रूटच्या इंग्लंड (England) संघाला भारताला (India) 227 धावांनी पराभूत करत मालिकेची विजयी सुरुवात केली. दुसर्या डावात यजमान संघाला 420 धावांचं लक्ष्य देत इंग्लंड गोलंदाजांनी एकत्र येत दुसऱ्या डावात भारताला 192 धावांवर गुंडाळलं आणि सहज विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने भारताला खाली ढकलत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये (World Test Championship Points Table) अव्वल स्थान गाठले. इंग्लंड आता विजयी टक्केवारी 70.2% आणि सहा मालिकेतील 442 गुणांसह डब्ल्यूटीसी (WTC) पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 11 सामने जिंकले आहेत तर 3 अनिर्णीत राहिला असून 4 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पराभवानंतर भारत डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलवर चौथ्या स्थानावर घसरला आहे. टीम इंडियाला (Team India) आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी कठीण आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. (ICC World Test Championship: इंग्लंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगमध्ये गरुडझेप, विराटसेनेची या स्थानी घसरण)
भारतीय संघासाठी सर्व काही संपलेले नाही, आणि त्यांना अद्याप वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात प्रवेश करण्याची त्यांना चांगली संधी आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीनपैकी किमान दोन सामने भारताला जिंकणे आवश्यक आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 मागे आहे आणि टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे गरजेचे असेल. दरम्यान, कसोटी मालिकेत विजयी सलामीनंतर इंग्लंड अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवेल हे जवळपास शक्य दिसत आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्लंड मालिकेत 3-0, 3-1 किंवा 4-0ने विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, भारताविरुद्ध इंग्लंडने 1-0, 2-0, किंवा 2-1 अशा फरकाने विजय मिळवल्यास तिसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहचेल. शिवाय, भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 1-1 किंवा 2-2 अशा अनिर्णीत राहिल्यास देखील ऑस्ट्रेलियाला फायनल गाठण्याची संधी आहे.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने नुकताच आपला दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केला ज्याचा न्यूझीलंडला फायदा झाला आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. जून महिन्यात क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे.