ICC Women's World Cup 2022: मिताली राजच्या टीम इंडियासाठी अजूनही आशेचा किरण शिल्लक, सेमीफायनलच्या वाटेत आता ‘या’ संघांशी होणार काट्याची टक्कर

आणि आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांतून किमान दोन सामने जिंकणे गरजेचे आहेत. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

ICC Women's World Cup 2022: मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Tem) सध्या न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या ICC महिला एकदिवसीय विश्वचषक (Women's ODI World Cup) 2022 मध्ये खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले असून दोनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहेत. त्यांचे एकूण चार गुण असून भारतीय संघ (Indian Team) विश्वचषक पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्ध 4 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग (India Semi-Final Qualification) कठीण झाला आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडच्या पराभवानंतर संघासाठी आशेचा एक किरण आणखी शिल्लक आहे. टीम इंडिया (Team India) पुढील तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि बांगलादेश यांच्याशी भिडणार आहे. अशा परिस्थितीत सेमीफायनलच्या रस्त्यात संघापुढे दोन मोठे संघ काट्याची टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. (ICC Women World Cup 2022 Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा, जाणून घ्या पॉइंट्स टेबलची स्थिती)

टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांनी बांगलादेशविरुद्ध सहज विजय मिळण्याची दाट शक्यता आहे, पण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. हे दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या 4 विकेट्सच्या पराभवानंतर भारताला आणखी एक पराभव परवडणारा नाही. संघ सध्या +0.632 च्या नेट रन रेट (NRR) सह गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या या पराभवानंतर अंतिम-4 ची शर्यत आणखी रंगतदार बनली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत विश्वचषकातील सर्व सामने जिंकले आहेत. या दोन संघांव्यतिरिक्त टॉप-4 च्या उर्वरित 2 स्थानांसाठी 3 संघांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारतीय संघाची स्थिती थोडी मजबूत दिसत आहे.

मात्र, अंतिम-4 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात विजयाची नोंद करावी लागणार आहे. हा सामना भारतासाठी निर्णायक ठरू शकतो. महिला विश्वचषक साखळी सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरी खेळतील. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत अपराजित असून त्यांचे सेमीफायनल खेळणे जवळपास निश्चित आहे. तर उर्वरित दोन जागांसाठी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.