ICC Women's World Cup 2022 Points Table: दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचे तिकीट, इंग्लंडच्या विजयाने उपांत्य फेरीची चुरस वाढली; पहा टीम इंडियाची स्थिती
तर पाकिस्तान महिलांविरुद्ध इंग्लंडच्या मोठ्या विजयाने टीम इंडियाला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या शेवटच्या सामन्यात विजय नोंदवणे भाग पडले आहे.
आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 मध्ये आज, 24 मार्च रोजी दोन सामानाने खेळले गेले. वेलिंग्टन येथे दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडिज महिला (West Indies Women) संघातील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. तर क्राइस्टचर्च येथे पाकिस्तान महिलांविरुद्ध गतविजेता इंग्लंड महिला (England Women) संघाने वर्चस्वपुर्ण विजय मिळवला. आजच्या या दोन सामन्यासह संघामधील सेमीफायनलची चुरस आणखी वाढली आहे. विंडीज महिला संघाविरुद्ध सामना अनिर्णित राहिल्याने दक्षिण आफ्रिका पॉईंट टेबलमध्ये 9 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करणारा ऑस्ट्रेलियानंतर दुसरा संघ ठरला, तर वेस्ट इंडिजची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता भारतीय संघ आफ्रिकेकडून पराभूत झाल्यास किंवा इंग्लंडने त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी एक गमावल्यास वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत प्रवेश करेल. (ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषक सामन्यांमध्ये आता 100 टक्के प्रेक्षकांना मिळणार एन्ट्री, ICC ने क्रिकेट चाहत्यांना दिली खुशखबर)
गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर विंडीज संघ आता 7 गुणासह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, तर टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. अशा परिस्थितीत भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या शेवटच्या सामन्यात विजय नोंदवणे भाग आहे. दुसरीकडे, इंग्लंडने पाकिस्तान महिला संघाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात बॉलनंतर बॅटने दमदार खेळ करून 9 विकेटने सामना जिंकला आणि सेमीफायनल जागेसाठी चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. टीम इंडियाप्रमाणेच गतविजेता इंग्लंडने देखील 6 पैकी 3 सामन्यांमध्ये विजयची नोंद केली आहे. मात्र इंग्लडने नेट रनरेटच्या जोरावर भारताच्या तुलनेत वरचढ ठरला.
इंग्लंड आणि पाकिस्तान महिला संघाच्या सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक जिंकून ब्रिटिश गोलंदाज कॅथरीन ब्रंट आणि सोफी एक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव 42 व्या षटकात केवळ 105 धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात डॅनी व्याट हिने 76 धावांची नाबाद खेळी करून 19.2 व्या षटकांत लक्ष्य गाठले आणि सेमीफायनलच्या दिशेने मोठा विजय नोंदवला. अशाप्रकारे पाकिस्तानवरील मोठ्या विजयाने इंग्लंड आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापासून एक पाऊल दूर आहे.