ICC Women's World Cup 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने पॉइंट टेबलचा संपूर्ण खेळ बदलला, जाणून घ्या सेमीफायनल शर्यतीत कोण पुढे?
उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वच संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने अखेर पहिला विजय नोंदवला आहे. दरम्यान वेस्ट इंडिजचा पराभव आणि पाकिस्तानच्या विजयाने गुणतालिकेचा सारा खेळच फिरवला आहे.
ICC Women's World Cup 2022 Points Table: महिला विश्वचषक 2022 चे सामने सुरूच आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वच संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाने (Pakistan Women's Cricket Team) अखेर पहिला विजय नोंदवला आहे. पाकिस्तान महिलांनी वेस्ट इंडिजचा (West Indies) 8 विकेटने धुव्वा उडवून विश्वचषकात सुरु आपली 18 सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली. अनुभवी ऑफ-स्पिनर निदा दारची (Nida Dar) धडाकेबाज गोलंदाजी आणि सलामीवीर मुनिबा अली (Muneeba Ali) हिच्या खेळीमुळे पाकिस्तानने (Pakistan) आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) स्पर्धेत सलग 18 पराभवानंतर पहिला विजय नोंदवला आणि पावसाने बाधित सामन्यात वेस्ट इंडिज महिलांचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने विश्वचषकात आपले खाते उघडले, तर विंडीजचा 6 सामन्यांपैकी हा तिसरा पराभव ठरला. दरम्यान वेस्ट इंडिजचा पराभव आणि पाकिस्तानच्या विजयाने गुणतालिकेचा सारा खेळच फिरवला आहे. (ICC Women's World Cup 2022: पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिला विजय, 8 विकेटने सामना जिंकून वेस्ट इंडिज महिलांचा विजयरथ रोखला)
ऑस्ट्रेलिया महिला संघ सर्व 5 सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत सर्व 4 सामने जिंकले आहेत. तसेच वेस्ट इंडिजच्या पराभवानंतर पॉइंट टेबल पूर्णपणे उघडले आहे. विंडीजने 6 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचे 6 गुण आहेत. विंडीज संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण इथे खेळ असा आहे की आता वेस्ट इंडिजचा एक सामना बाकी आहे. विंडीज महिलांच्या पराभवामुळे भारत आणि इंग्लंड संघहच मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक असून जर या दोघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आणि विंडीजने आपला सामना जिंकला तर तिघांचेही 8 गुण होतील. आणि नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल.
दुसरीकडे मात्र, वेस्ट इंडिज संघ शेवटचा सामनाही हरला तर इंग्लंड आणि भारत 2 सामन्यांपैकी 1-1 सामने जिंकूनही उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात. पण इथेही सर्वकाही नेट रनरेटवर अवलंबून असेल. तसेच लक्षात घ्यायचे की यजमान न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.