ICC T20I Rankings: बाबर आझमला मागे टाकत डेविड मलान अव्वल स्थानी विराजमान, टॉप-10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची मालिका संपल्यानंतर आयसीसी टी-20 क्रमवारीत काही मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानने टी-20 क्रमवारीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची बादशाही संपवली. भारताच्या केएल राहुलची चौथ्या स्थानावर घसरण झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक स्थानाचा फायदा झाला असून तो 9 व्या स्थानी आला आहे.

ICC T20I Rankings: बाबर आझमला मागे टाकत डेविड मलान अव्वल स्थानी विराजमान, टॉप-10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय
डेव्हिड मालन (Photo Credit: Getty)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका संपली आहे. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध मालिकेतल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मिशेल मार्चच्या दमदार खेळीच्या जोरावर 5 गडी राखून विजय मिळवला. मालिका संपल्यानंतर आयसीसी टी-20 क्रमवारीत काही मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानने (Dawid Malan) टी-20 क्रमवारीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) बादशाही संपवली. मलानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 43 च्या सरासरीने 129 धावा केल्या. भारताच्या केएल राहुलची (KL Rahul) चौथ्या स्थानावर घसरण झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक स्थानाचा फायदा झाला असून तो 9 व्या स्थानी आला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंच तिसर्‍या क्रमांकावर तर न्यूझीलंडचा कोलिन मुनरो पाचव्या स्थानावर घसरला. (ENG vs AUS 3rd T20I: तिसर्‍या टी-20 सामन्यात इंग्लंड 5 विकेट पराभूत, ऑस्ट्रेलिया पुन्हा टी-20 रँकिंगमध्ये बनली किंग)

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल फलंदाजांच्या क्रमवारीत 6 व्या स्थानावर आहे, तर अष्टपैलूंच्या रँकिंगमध्ये त्याने दुसरे स्थान मिळवले आहे. तिसर्‍या सामन्यात न खेळणार्‍या इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनलाही क्रमवारीत नुकसान झालं आणि तो दहाव्या स्थानावर घसरला. दरम्यान, गोलंदाजीत अ‍ॅडम झांपाची दोन स्थानाची घसरण झाली, तर आदिल रशीदला दोन स्थानाचा फायदा झाला असून तो 7 व्या स्थानावर पोहचला आहे. केन रिचर्डसन टॉप-10 मध्ये एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मोहम्मद नबीचे अव्वल स्थान कायम आहे, तर मॅक्सवेलने एक स्थानाची झेप घेऊन दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा टी-20 टीम क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने मालिकेची सुरुवात जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ म्हणून केली होती. ऑस्ट्रेलिया क्रमवारीत इंग्लंडपेक्षा 10 गुणांनी पुढे होता, पण इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यांमध्ये धूळ चारून पहिल्या स्थानावर आपले नाव कोरले होते. त्यावेळी इंग्लंड-ऑस्ट्रेलियाकडे 273 गुण होते, पण ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची टी20 क्रमवारीतील दोन दिवसांची बादशाही संपवली आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा टी-20 मध्ये अव्वल स्थान मिळवले.

(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2020 02:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).