ICC T20I Batting Rankings: विराट कोहली याचे टॉप-10 मध्ये पुनरागमन; केएल राहुल यानेही घेतली झेप, रोहित शर्मा च्या क्रमवारीत घसरण

दुसरीकडे, नियमित सलामी फलंदाज रोहित शर्मा एक स्थान खाली घसरला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

विराट कोहली (Virat Kohli) याने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध टी-20 सामन्यात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत फलंदाजांच्या आयसीसी (ICC) क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यातभारताने वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत 2-1 ने विजय मिळविला होता. या मालिकेत कर्णधार कोहलीची प्लेअर ऑफ द सीरिज म्हणून निवड करण्यात आली. आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीतही विराटला फायदा झाला आहे. पाच स्थानांची झेप घेऊन विराट पुन्हा एकदा पहिल्या दहा फलंदाजांमध्ये सामील झाला, तर सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यानेही क्रमवारीत झेप घेतली आहे. दुसरीकडे, नियमित सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) एक स्थान खाली घसरला आहे. रोहितबरोबर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संयुक्तपणे सर्वाधिक धावा करणारा कोहलीने हैदराबादमध्ये नाबाद 94 आणि तिरुअनंतपुरममध्ये 19 धावांची खेळी केली होती. आणि निर्णायक सामन्यात कोहलीने 29 चेंडूत 70 धावांची महत्वाची खेळी केली.

पाकिस्तानचा बाबर आजमआंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज म्हणून कायम आहे. रँकिंगमध्ये पहिल्या पाच फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. टॉप -5 मध्ये बाबर आझम, आरोन फिंच, डेव्हिड मालन, कॉलिन मुनरो आणि ग्लेन मॅक्सवेल कायम आहेत. दुसरीकडे, राहुलने तीन स्थानांची झेप घेत सहावे स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत राहुलने अनुक्रमे 62, 11 आणि 91 धावा केल्या. कोहलीला पाच स्थानाचा फायदा झाला आहे. विराटने नाबाद 94, 19 आणि नाबाद 70 धावांची डाव खेळला.

दुसरीकडे, रोहितचा एक स्थान खाली घसरण झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दोन टी-20 सामन्यात रोहितला जास्त धावा करता आल्या नाहीत पण तिसर्‍या सामन्यात त्याने 71 धावा केल्या. रोहितने मालिकेत 8, 15 आणि 71 धावा केल्या. ज्यामुळे, तो एक स्थान घसरून 9 व्या स्थानी पोहचला आहे. अशा प्रकारे पहिल्या दहा फलंदाजांमध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे.