ICC T20 World Cup 2021: उद्या मिळू शकतो विश्वचषकचा पहिला Semifinalist संघ, ‘या’ विश्वविजेत्या टीमकडे आहे संधी

जर इंग्लंडचा संघ सलग चौथा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर सोमवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरेल.

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

ICC T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत जबरदस्त लयीत धावणारा इंग्लंड (England) संघ सोमवारी येथे गट-1 टप्प्यातील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मैदानात उतरेले तेव्हा त्यांचे लक्ष उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याकडे करेल. दुसरीकडे श्रीलंकेला अंतिम चार गाठण्याच्या आपल्या आशा पल्लवित ठेवायच्या असतील तर त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. जर इंग्लंडचा संघ सलग चौथा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर सोमवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत (T20 World Cup Semifinal) प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरेल. दरम्यान इंग्लंडसह गट 2 मध्ये बाबर आजमचा पाकिस्तान संघ देखील सेमीफायनल स्थानाचा मजबूत दावेदार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानने (Pakistan) आपापल्या गटात आतापर्यंत खेळलेले सर्व तीन सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. (ICC T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूची भविष्यवाणी; ‘या’ 4 संघात सेमीफायनल, तर ‘या’ दोघांत रंगणार टी-20 विश्वचषक फायनलचा महामुकाबला)

इंग्लंडला यापूर्वीच स्पर्धेतील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते आणि संघाने त्यांचे पहिले तीन सामने त्याच पद्धतीने खेळले आहेत. यादरम्यान शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजयाने त्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. इयन मॉर्गनच्या नेतृत्वात एकदिवसीय विश्वविजेता संघ सर्व कमकुवत दुवे पूर्ण करून इथपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्याकडे सांघिक खेळाडूंचा पर्यायही आहे पण आतापर्यंत त्यांचा वापर करण्याची गरज पडलेली नाही. इंग्लंडच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या दाट शक्यतांचे आणखी एक कारण म्हणजे सलामीवीर जोस बटलरची चमकदार लय आहे. बटलरची नाबाद खेळी रोखण्यात ऑस्ट्रेलियाचे जागतिक दर्जाचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. तथापि मधल्या फळीच्या फलंदाजांची लय ही त्यांच्यासाठी सध्या चिंतेची बाब बनली आहे. तीन सामन्यांतील मोठ्या विजयांमुळे मधल्या फळीला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही पण कर्णधार मॉर्गनला विश्वास आहे की हे फलंदाज आवश्यक क्षणी चांगली कामगिरी बजावतील.

मॉर्गनला फलंदाजीची संधी मिळाली नसेल, पण त्याने नेतृत्वाने छाप पाडली आहे. दुसरीकडे संघाचे गोलंदाजही जबरदस्त लयीत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने नव्या चेंडूसह चमकदार कामगिरी केली आणि क्रिस जॉर्डननेही तीन विकेट्स घेत लयीत परतण्याची चिन्हे दाखवली. शेवटच्या षटकांचा स्पेशालिस्ट टायमल मिल्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध थोडा महागडा ठरला पण तो संपूर्ण स्पर्धेत विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. पार्ट-टाईम फिरकी गोलंदाज लियाम लिव्हिंगस्टोननेही संघासाठी चांगली कामगिरी करत असल्यामुळे मॉर्गनला गोलंदाजीत आणखी एक चांगला पर्याय मिळाला आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचे वर्चस्व रोखण्यासाठी श्रीलंकेला विशेष काहीतरी करावे लागणार आहे.



संबंधित बातम्या