ICC T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूची भविष्यवाणी; ‘या’ 4 संघात सेमीफायनल, तर ‘या’ दोघांत रंगणार टी-20 विश्वचषक फायनलचा महामुकाबला
वॉर्नने सांगितले की कोणते चार संघ अंतिम चारमध्ये पोहोचतील. तसेच यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना कोणते दोन संघ खेळणार याच्या नावावर त्यांनी आपले मत मांडले आहे. वॉर्नने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे समीकरण ट्विटरवर स्पष्ट केले आहे.
ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारत (India), न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (England) या संघांना स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. यामध्ये गतविजेता वेस्ट इंडिजचा सेमीफायनलचा मार्ग कठीण दिसत आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना यापैकी एकाचा मार्ग सुकर करेल. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड संघ सर्वात मोठे दावेदार म्हणून समोर आले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड हे एकमेव संघ आहेत ज्यांनी आतापर्यंत खेळलेले सर्व तीन सामने जिंकण्याचा कारनामा केला आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने (Shane Warne) स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे समीकरण तयार केले आहे. वॉर्नने सांगितले की कोणते चार संघ अंतिम चारमध्ये पोहोचतील. तसेच यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना कोणते दोन संघ खेळणार याच्या नावावर त्यांनी आपले मत मांडले आहे. वॉर्नने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे समीकरण ट्विटरवर स्पष्ट केले आहे. (IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या ‘या’ फिरकी जोडीपासून सावधान विराट कोहली, 2016 मध्ये खेळ खराब केला आहे)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1,000 हून अधिक विकेट घेणारा वॉर्न म्हणाला, “मला अजूनही विश्वास आहे की जे संघ प्रत्येक गटात अव्वल राहतील आणि सेमीफायनल व अंतिम सामना खेळतील ते असे असतील... इंग्लंड, ऑस्ट्रेलिया (Australia), पाकिस्तान आणि भारत. सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध भारत, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान. त्यामुळे फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यापैकी एक असेल,” वॉर्नने ट्विट केले. इंग्लंड आणि पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तसेच भारताने आतापर्यंत फक्त एक सामना खेळला आहे ज्यात त्यांना त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आता दुबईत रविवारी संध्याकाळी न्यूझीलंडशी भिडणार आहे.
यापूर्वी शनिवारी जोस बटलरने 32 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून मोठा विजय मिळवला. वनडे विश्वविजेत्या इंग्लंडने कांगारू संघाला अवघ्या 125 धावांवर गुंडाळले आणि त्यानंतर 126 धावांचे लक्ष्य केवळ 11.4 षटकांत पूर्ण करून गट 1 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान बळकट केले.