IND vs AUS Test Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, जसप्रीत बुमराह होऊ शकतो संघाचा भाग
त्यामुळे आता मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका (Border-Gavaskar Test Series) सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून क्रिकेट क्षेत्रापासून दूर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) येथे नेटवर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे, त्यामुळे बुमराहला सलग अनेक महत्त्वाच्या मालिका खेळता आल्या नाहीत.
तसेच जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी फिटनेस सिद्ध करण्यात यशस्वी झाला तर तो धर्मशाळामध्ये खेळताना दिसू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने मीडियाला सांगितले की, जसप्रीत बुमराहने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. तो लवकरच तंदुरुस्त घोषित होईल अशी आशा आपण सर्वांनी बाळगली पाहिजे. (हे देखील वाचा: Team India New Record In T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने केला अनोखा विश्वविक्रम, पाकिस्तानचा 'हा' विक्रम काढला मोडीत)
पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीला खेळवला जाणार
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी नागपुरात होणार आहे. सध्या, बीसीसीआयने फक्त पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट यांचा पर्याय उपलब्ध आहे.
कसोटी मालिका जिंकणे भारतासाठी महत्वाची
दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी ही कसोटी मालिका जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर टीम इंडियाने ही कसोटी मालिका 2-0 पेक्षा जास्त फरकाने जिंकली तर टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे अंतिम फेरीतील स्थानही जवळपास निश्चित मानले जात आहे.