माजी Team India क्रिकेटपटू किरण मोरे यांची अमेरिका क्रिकेटच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड

मोरे यांना सहाय्य म्हणून माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे आणि सुनील जोशी यांची देखील नियुक्त केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये टीम इंडिया (Team India) च्या पराभवामुळे चाहते आणि खेळाडू निराश झाले आहेत. दुसरीकडे, भारतीय क्रिकेटसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिका क्रिकेट (America Cricket) संघाच्या प्रशिक्षकपदी एक नाही तर तब्बल दोन माजी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अमेरिका क्रिकेट टीमचे कोच पुबुदु दसानायके (Pubudu Dassanayake) यांनी अनपेक्षित राजीनामा दिला. मागील काही दिवस अमेरिका क्रिकेट आणि दसानायके यांच्यातले संबंध बिघडले असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आणि आता अमेरिका क्रिकेटने संघाच्या प्रशिक्षक पदी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांची निवड केली आहे.

दरम्यान, मोरे यांना सहाय्य म्हणून माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे (Pravin Amre) आणि सुनील जोशी (Sunil Joshi) यांची देखील नियुक्त केली आहे. याआधी आमरे यांनी अंडर 19 भारतीय संघाचे कोच म्हणून काम केलं आहे तर जोशी यांनी बांग्लादेश (Bangladesh) संघाच्या फिरकी खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.

क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, मोरे यांनी मागील आठवड्यापासून बैठका घेण्यास सुरुवात केली होती. सध्या मोरे अंतरिम कोच आहेत. पण जोशी यांना पूर्णवेळ ही जबाबदारी दिली जाणार आहे. मागील वर्षी अमेरिकेच्या टी-20 संघाची घोषणा करण्याच्या वेळी मोरे आणि दसानायके यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती.